Nana Patole News | राज्यात काँग्रेस नेतृत्वात बदल, प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ तर विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार, नाना पटोले प्रतिक्रिया देताना म्हणाले…

मुंबई : Nana Patole News | काँग्रेस हायकमांडने स्वच्छ प्रतिमा असलेले बुलाढाण्याचे निष्ठावंत नेते हर्षवर्धन सकपाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रस्थापित नेते, राजकीय घराणे, साखर सम्राट, शिक्षण सम्राट यापैकी काहीही नसलेले हर्षवर्धन सकपाळ यांच्या हातात काँग्रेसने राज्याची सूत्रे सोपवली आहेत. सकपाळ हे 2014 ते 2019 या काळात आमदार म्हणून निवडूण आले होते. काँग्रेसमध्ये विविध महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे, त्यांच्या निवडीनंतर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. यानंतर प्रदेशाध्य नाना पटोले यांना पदावरून हटविले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच पटोले यांनीही पक्ष नेतृत्वाकडे राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आता हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडे पक्षाने प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपवली आहे.

हर्षवर्धन सकपाळ यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. सकपाळ यांच्या निवडीनंतर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना संघटनेचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांना दांडगा अनुभव असून विविध पदावर त्यांनी काम केले आहे. राजीव गांधी पंचायत राज संघटनचे ते विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. विद्यार्थी दशेपासून ते राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहेत.

पटोले म्हणाले, जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव पदासह पक्ष संघटनेत विविध पदावर काम करत त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या सर्वोदयी विचारांवर काम करणारे ते कार्यकर्ते आहेत, त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाचा फायदा होईल.

सकपाळ यांना शुभेच्छा देताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र राज्य काँग्रेस विचाराला माननारे राज्य आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारी ठरेल. त्यांच्या कारकीर्दीत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नव्या उंचीवर पोहचेल. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नवनियुक्त विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.