Ulhasnagar Thane Crime News | कलयुग ! मालमत्तेच्या वादातून बापाने पोटच्या मुलाचा गळा चिरला, पैशांसाठी रक्ताचं नातं विसरला

ठाणे : Ulhasnagar Thane Crime News | मालमत्तेच्या वादातून पोटच्या मुलाचा गळा चिरल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे. यश अनिल वाघचौरे याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनिल वाघचौरे या हल्लेखोर बापाला अटक केली आहे.
अनिल वाघचौरे हा उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक- ४, हनुमान नगर परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी अनिलचा मुलगा यश याच्यासोबत वाद सुरु होता. वडिलांनी मालमत्ता विकून पैसे द्यावेत, यासाठी यशने वडिलांकडे तगादा लावला होता.
मंगळवारी दोघांमध्ये पुन्हा याच कारणातून कडाक्याचं भांडण झालं. यावेळी संताप अनावर झाल्याने अनिल वाघचौरे यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता धारदार चाकुने मुलगा यशच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात यश रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर जखमी मुलाची आई स्मिता वाघचौरे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अनिल वाघचौरे यास अटक केली आहे.