Tingre Nagar Vishrantwadi Crime News | इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणार्‍या चोरट्याच्या गुजरातमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

टिंगरेनगर येथून चोरलेल्या टेम्पोसह 18 लाख 69 लाखांचा माल केला हस्तगत, विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी

पुणे : Tingre Nagar Vishrantwadi Crime News | इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो टिंगरेनगर येथून चोरुन तो गुजरात राज्यात घेऊन गेलेल्या चोरट्याला विश्रांतवाडी पोलिसांनी भरुच येथून जेरबंद केले. त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपयांचा महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले १६ लाख १९ हजार ४१७ रुपयांचा इलेक्ट्रीक साहित्य असा एकूण १८ लाख ६९ हजार ४१७ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

याबाबत विजय विठोबा भिकुले (वय ५४, रा. आदर्श कॉलनी, टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हाई टेक कॉपोरेशन या दुकानात चालक म्हणून कामाला आहेत. पिंपरी चिंचवड भागातील ऑर्डर पुरविण्यासाठी त्यांनी टेम्पोमध्ये कामगारांकरवी माल भरला होता. तो टेम्पो घेऊन ते घरी गेले. दुसºया दिवशी ते माल पोहच करणार होते. घराजवळ त्यांनी २९ जानेवारी रोजी टेम्पो पार्क केला होता. ३० जानेवारीला सकाळी ६ वाजता ते गाडी घेण्यासाठी गेले असताना टेम्पो चोरीला गेल्याचे आढळून आले. दोन दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांनी १ फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल करुन घेतली.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार भोसले, संजय बादरे, पोलीस अंमलदार अक्षय चपटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हा गुन्हा प्रशांत दिगंबर पाटील (रा. औरंगाबाद) याने केला असून चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी तो गुजरातमधील भरुच येथे गेला आहे. या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व त्यांचे सहकारी भरुच येथे पोहचले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेऊन प्रशांत पाटील याला टेम्पोसह पकडले. त्याच्याकडून टेम्पो व त्यातील इलेक्ट्रीक माल असा १८ लाख ६९ हजार ४१७ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.