Solapur Crime News | बायको आणि मुलांना भेटायला आले, घरी पोहचताच पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेत संपवलं जीवन, घटनेने पोलीस दलात खळबळ

सोलापूर : Solapur Crime News | ड्युटीवरून घरी पोहोचताच पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश ज्योतीराम पाडुळे असे आत्महत्या केलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये (Solapur Rural Police) कार्यरत होते. गावाकडे आपल्या बायको आणि मुलांना भेटायला गेले असता त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Policeman Suicide News)
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलिस मुख्यालयामध्ये सेवा बजावणारे महेश पाडुळे यांनी अज्ञात कारणावरून बार्शी तालुक्यातील वैराग येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील अंजनगावचे मूळ रहिवासी असलेले महेश पाडुळे हे वैराग पोलिस ठाण्यामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंबासह वैराग येथे राहत होते. त्यानंतर त्यांची बदली सोलापूर मुख्यालय येथे झाली होती.
बुधवार (दि.१२) महेश पाडुळे ड्युटीवरून घरी आले. घरी पोहचताच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना वैराग येथील वैराग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ६ वर्षांचा मुलगा, एक ८ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.