Madha Solapur Crime News | गळफास घेत पतीची आत्महत्या, अंत्यसंस्काराच्या रात्रीच ४ वर्षाच्या मुलीसह पत्नीचेही टोकाचे पाऊल, विहिरीत तरंगताना आढळले मृतदेह, एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा

सोलापूर : Madha Solapur Crime News | पतीच्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही चार वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घाटणे (ता. माढा) येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवार(दि.६) दुपारी आत्महत्या केली होती. त्यानंतर विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्याच्या पत्नीने देखील अवघ्या चार वर्षाच्या मुलीसह त्याच रात्री १ वाजताच्या दरम्यान गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

जनाबाई हरिभाऊ लोंढे (वय -३२) व मुलगी साजरी हरिभाऊ लोंढे (वय -४) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि.९) सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.६) दुपारी हरिभाऊ जानु लोंढे (रा. घाटणे ता.माढा) यांनी घरातील लोखंडी ॲंगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री घाटणे (ता.माढा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते. पतीच्या मृत्यूनंतर पोटच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार या विचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले.

रात्री १ वाजताच्या सुमारास हताश झालेली पत्नी कोणालाही न सांगता ४ वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर महिला व तिची लहान मुलगी नसल्याचे नातेवाईकांना समजले. त्यावर नातेवाईक व गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली.

परंतु, मिळून न आल्याने शुक्रवार (दि.७) रोजी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्वत्र शोध सुरु असताना (दि.९) रोजी गावातील शाळकरी मुलांना गावातील जानुबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी वर तरंगताना दिसली. त्यानंतर त्यांची ओळख पटली असता पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली.