Kolhapur Crime News | आईचा मृतदेह पाहताच लेकीला हृदयविकाराचा झटका, एकाच दिवशी दोघींचा मृत्यू , परिसरातून हळहळ व्यक्त

कोल्हापूर : Kolhapur Crime News | आईचा मृतदेह पाहताच लेकीला हृदयविकाराचा झटका आल्याने एकाच दिवशी दोघींचा मृत्यू झाला आहे. कबनूर येथील चिंतामणी कॉलनीमध्ये मंगळवारी कुसुम विनायक नाकील (वय ७५, रा. कबनूर) व अनिता अनिल इगाते (वय-५५, रा. वाळवा, जि. सांगली) या माय-लेकीचे एकाच दिवशी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी कॉलनी येथे राहणाऱ्या कुसुम यांचे राहत्या घरी मंगळवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी वाळवा येथे राहणारी त्यांची मुलगी अनिता ही कबनूर येथील घरी साडेपाचच्या सुमारास पोहोचली.

आईचा मृतदेह पाहून धक्का बसल्याने अनिता जागीच कोसळल्या. त्यांना प्रथमतः खासगी व नंतर इचलकरंजी मधील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी रुग्णालयात येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

आई कुसुम यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे तर अनिता यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कुसुम हिच्यावर फरांडे मळा येथील स्मशानभूमीत तर मुलगी अनिता हिच्यावर वाळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माय- लेकींनी एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.