Kolhapur Crime News | प्रेमविवाह केल्याचा सासऱ्याच्या डोक्यात राग, जावयाचे अपहरण करून अर्धनग्न अवस्थेत कोंडून ठेवलं, मारण्याचा कट, जावयाची सिनेस्टाईल सुटका (Video)

कोल्हापूर : Kolhapur Crime News | इन्स्टाग्रामवर ओळख होऊन तरुण तरुणीने प्रेम विवाह केला. मात्र आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून सासऱ्याचा जावयाचे अपहरण करून मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे. विशाल अडसूळ (वय-२६) असे या तरुणाचे नाव आहे. (Kidnapping Case)
मुलीच्या वडिलांनी त्यांच्या जावयाला सांगली मधल्या घरात कोंडून ठेवले होते. तसेच जावयाला दोरीने बांधून जबर मारहाण करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तरुणाची सुटका केली आहे. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापाने जावयाला अर्ध नग्न अवस्थेमध्ये दोन दिवस कोंडून ठेवले होते. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विशालची सुटका केली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह इतरांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान करवीर तालुक्यातील विशाल अडसूळ याला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने अर्टिगा गाडीतून तीन युवकांनी सोबत घेतले. मुलगा सापडत नसल्यामुळे विशालच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर विशालला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली होती.
विशाल अडसूळ याचा प्रेम विवाह झाला असून त्याच्या सासऱ्यांनीच विशालला किडनॅप केले आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने विशालचे सासरे राहत असलेल्या मिरज सांगली मधल्या कुपवाडमध्ये सापळा रचून सासरे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतले. त्यांना विशाल कुठे आहे? हे विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी आणखी चौकशी केली असता सासऱ्यांनी विशालला वेदस अपार्टमेंट मिरज सांगली मध्ये कोंडून ठेवल्याचे त्यांनी कबुल केले. विशालला किडनॅप करण्यात ६ जणांनी मदत केल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर पोलीस वेदस अपार्टमेंटमध्ये गेले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना विशाल अत्यंत जखमी आणि हात बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. यानंतर पोलिसांनी जखमी विशालला रुग्णालयात दाखल केले. विशालवर सध्या उपचार सुरू असून त्याची मानसिक अवस्थाही अत्यंत खराब आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी सासरे श्रीकृष्ण कोकरे आणि त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा तपास सुरु आहे.