Ajit Pawar | अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकार्यांना तातडीने मुंबईत बोलावले, परळीतील बोगस बिलांच्या चौकशीला वेग, मुंडे अडचणीत

मुंबई : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये घेतलेल्या डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या परळीत कामे न करताच बोगस बिलांद्वारे रक्कम घेऊन कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला होता. या व इतर प्रकरणाच्या चौकशीला आता वेग आला असून अजित पवार यांनी या संबंधी माहिती घेण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकार्यांना तातडीने मुंबईला बोलावले होते.
या प्रकरणात तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर संशयाची सुई आहे. 73 कोटींच्या या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार यांनी मागील दोन वर्षांतील निधीच्या वितरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. आता अजित पवार अॅक्शन मोडमध्ये असून त्यांनी बीडच्या जिल्हाधिकार्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतले आहे.
बीडचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन समितीची बैठक होताच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत केले आहे.
बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीत तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत करण्यात आली असून मागील दोन वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी करण्यात येत आहे.
अजित पवारांनी निर्देश दिल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. चिंचाने हे कागदपत्रांसह मुंबईच्या कार्यालयात आले आहेत. या चौकशीत शाळा आणि अंगणवाड्यांना साहित्य पुरवण्याच्या कामात मोठी अनियमितता दिसून आली आहे.