Pune Police News | फसवणुकीची तक्रार दाखल करुन न घेतल्याने ज्येष्ठ महिलेची पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव; प्राधिकरणाकडून सर्व संबंधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना समन्स, 13 फेब्रुवारीपर्यंत मागविला अहवाल

पुणे : Pune Police News | एका बाजूला माजी मंत्र्याच्या मुलासाठी सर्व पोलीस यंत्रणा राबत असल्याचे दृश्य दिसत असताना दुसर्या बाजूला वडगाव शेरी येथील प्लॉटवर जबरदस्तीने बनावट कागदपत्राच्या आधारे ताबा घेणाऱ्या विरुद्ध ज्येष्ठ महिलेने केलेल्या तक्रारीवर वर्षभरात गुन्हा दाखल करुन कारवाई करायला पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेवटी या ज्येष्ठ नागरिक महिलेने पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनवरुन पुणे पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करुन संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावल्याचे सोमवारी दिसून आले. प्रत्यक्षात या मुलाचे अपहरण झाले नव्हते तर तो मित्रांसह बँकॉकला खासगी विमानाने जात असल्याचे आढळून आले. ते विमान विशाखापट्टणम येथून पुन्हा माघारी बोलावण्यात आले. दुसरीकडे महिलेच्या जागेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ताबा करणार्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास तब्बल वर्षभर पुणे पोलिसांना वेळ मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.
याबाबत सुमनदेवी चंदूलाल तालेरा (वय ७६, रा. साऊथ कोर्ट, साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दिली आहे. प्राधिकरणाने या सर्व पोलीस अधिकार्यांना समन्स बजावले असून येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
वादी सुमनदेवी तालेरा यांच्याकडे वडगाव शेरी येथील सर्व्हे नं. ५१/१मधील प्लॉट नं. ५५, ५६, ६९ या प्लॉटचा ताबा १९९२ पासून आहे. त्यावर त्यांनी सुरक्षा रक्षकही नेमला आहे. या प्लॉटमधील असलेला घनकचरा साफ करुन घ्यावा व मोकळ्या जागेवर घनकचरा साठू नये, म्हणून त्यावर चारही बाजूने कंपाऊंड करण्याबाबत १६ मे २०२३ रोजी पुणे महापालिकेने सुचना वजा पत्राने दिले होते. प्लॉटवर स्वच्छता करुन घेणे व कंपाऊंड करण्याबाबत उमेश कोंडेला याला दिला होता. ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी त्यांच्या प्लॉटचा वॉचमन अश्विनीकुमार याने फोनवरुन कळविले की, वडगाव शेरी येथील प्लॉटवर कासीम शेख हा १० ते १२ जणांना घेऊन प्लॉटवर आला आहे. प्लॉटवर ताबा घेण्यासाठी आला आहे. त्यावेळी पोलीसही तेथे आले व त्यांनी कागदपत्रे घेऊन येण्यास सांगितले.
फिर्यादीच्या मुलास धमकी देऊन अनवी रिएल्टर्सतर्फे भागीदार असलेले पृथ्वीराज प्रकाश सोळंके, कुलमुख्यत्यारधारक रामदास काळुराम मोरे, कासीम शेख यांनी प्लॉटवर अनाधिकृतपणे ताबा करण्यासाठी आले होते. याबाबत त्यांनी ८ जानेवारी व १२ जानेवारी ला दिलेल्या तक्रारीनुसार एफ आय आर दाखल करणे आवश्यक होते. सर्व प्लॉट सुमनदेवी तालेरा यांच्या ताब्यात असताना त्यांची सून सोना सुभाष तालेरा हिने व जाऊ सुशिला सुरेश तालेरा यांनी सुमनदेवी यांच्या संमतीने १९९६ मध्ये अरोरा यांना प्लॉट नं. ६९ ची विक्री केली होती. त्याचे खरेदीखत करण्याकरीता पैसे घेऊन रजिस्टरी ऑफिसला गेले नसल्याने अरोरा यांनी फिर्यादीच्या मुलासह सुन व जाऊ यांच्याविरुद्ध सिव्हिल कोर्टात दावा केला होता. त्या दाव्यात त्यांच्या मुलाने अरोरा सोबत तडजोड केली. त्यांच्या मुलाची पल्लवी रियल इस्टेट कंपनीच्या नावे प्लॉट नं. ६९ करुन घेतला. या कंपनीची सुमनदेवी या संचालक आहे. प्लॉट नं. ६९ हा पल्लवी रियल इस्टेटच्या नावे असताना सोना तालेरा व सुशिलादेवी यांनी २०२४ मध्ये बेकायदेशीरपणे बनावट कागदपत्राच्या आधारे अवनी रियल्टर्स तर्फे भागीदार पृथ्वीराज सोळंके यांना कनव्हिन्स डीड करुन दिला. त्यांच्या करवी सुमनदेवी यांच्या कायदेशीर हक्कात अतिक्रमण केले. याबाबत कायदेशीर कारवाई करावी, म्हणून सुमनदेवी यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले तरी कोणतीही कारवाई न करता २७ नोव्हेबर २०२४ पर्यंत कोणत्याही प्रकारची एफ आय आर न नोंदविता समज देऊन सुमनदेवी यांना कळविले की, तुमचा अर्ज दप्तरी फाईल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्तव्यात कसुर केल्याने त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे या पोलीस अधिकार्याविरुद्ध पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे.
डोंगरगाव गट नं. ३७५/४ असलेली २ हेक्टर ७४ आर जमिनीच्या फसवणुकीबाबत तक्रार करुनही पोलिसांनी त्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांचा अर्ज दप्तरी दाखल केला आहे. ही जमीन १९९१ मध्ये वादी सुमनदेवी तालेरा यांनी आपला भाऊ डॉ. गुलाब बंब यांच्या नावावर खरेदी केली होती. ती भावाच्या नावावर असली तरी तिचा ताबा सुमनदेवी यांच्याकडेच होता. डॉ. गुलाब बंब यांचे ११ फेब्रुवारी २००८ रोजी झाले. त्या नंतरही २०२३ पर्यंत डॉ. गुलाब बंब यांच्या निधनानंतर १५ वर्षे सुमनदेवी यांच्या कब्जात व वहिवाटीत होती. त्यांचा नातू रिषभ तालेरा याने २०२३ मध्ये डॉ.गुलाब बंब यांचे नावावर असलेली जमिन स्वत:च्या नावावर करण्यासाठी डोंगरगाव तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाला त्यांनी डॉ. गुलाब बंब यांचे मृत्युपत्र पुरावा म्हणून सादर केले होते. याची माहिती मिळताच त्यांनी हरकत घेतल्याने तलाठ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आहे. सुमनदेवी यांचा मुलगा सुभाष तालेरा व त्याची पत्नी सोना तालेरा यांच्यामध्ये २००३ पासून कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने त्यांचा नातू रिषभ याला फूस लावून सुमनदेवी यांच्या ताब्यात असलेली जमीन नातू रिषभ याच्या नावावर बनावट कागदपत्रांद्वारे हस्तांतरण करण्याबाबत प्रयत्न करीत आहे. बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार सुमनदेवी यांनी डिसेंबर २०२३ मध्ये लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला़ त्यांचा तक्रार अर्ज फक्त चौकशीवर ठेवून व विविध अधिकार्यांकडे वर्ग करुन वेळ काढूपणा केला आहे. शेवटी २ डिसेंबर २०२४ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी हा अर्ज दप्तरी दाखल केल्याबाबत कळविले आहे. त्यामुळे सुमनदेवी तालेरा यांनी गुन्हेगारी कृत्य असतानाही त्यांच्या तक्रारीवर गुन्हा न नोंदविल्याने सुमनदेवी तालेरा यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सावळाराम सालगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब टापरे आणि सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे या पोलीस अधिकार्यांविरुद्ध पुणे विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.