Pune Crime Branch News | एनडीए-खडकवासला रोडला सापळा रचून सराईत गुन्हेगारांना अटक; 2 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे जप्त

पुणे : Pune Crime Branch News | खंडणी विरोधी पथकाने एनडीए -खडकवासला रोडला सापळा रचून दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अनिकेत विनायक जाधव (वय २४, रा. धायरी गारमाळ, खंडोबा मंदिराजवळ) आणि गणेश तानाजी किवळे (वय २३, रा. सिंहगड किरकिटवाडी रोड, नांदोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pistol Seized)
अनिकेत जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांच्या बरोबर मिळून पूर्व वैमनस्यातून ओंकार सुतार, करण पटेकर, फैजल काझी यांच्यांवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले होते. सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अनिकेत जाधव सह सहा जणांना अटक केली होती. (Anti Extortion Cell)
खंडणी विरोधी पथक सोमवारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण व अमर पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक जण एनडीए – खडकवासला रोडला कोंढवे धावडे येथे पिस्टल घेऊन थांबला आहे. या बातमीची खातरजमा करुन पोलीस पथक तेथे पोहचले. त्यांनी तेथे थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. अनिकेत जाधव याच्या कमरेला १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतुस व गणेश किवळे याच्या कमरेला १ देशी बनावटीच पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा ४५ हजार ६०० रुपयांचा माल मिळून आला. त्यांच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, मयुर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, रवींद्र फुलपगारे, प्रविण ढमाळ, अमर पवार यांनी केली आहे.