Pune ACB Trap Case | टेमघर धरणात जमीन गेलेल्यांना भुखंड मंजुर करुन देण्यासाठी ४ लाखांची लाचेची मागणी; पहिला हप्ता घेताना उपविभागीय कार्यालयातील महिला अव्वल कारकूनासह दोघांना अटक

पुणे : Pune ACB Trap Case | टेमघर धरणात जमीन संपादन झाल्यामुळे आठ जणांचे प्रस्ताव मंजुर करुन देण्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे लाच देण्याची मागणी झाली. तडजोडीअंती ३ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ६० हजार रुपये घेताना खासगी व्यक्तीसह शिरुर उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकूनला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. (Pune Bribe Case)
अव्वल कारकून सुजाता मनोहर बडदे (Sujata Manohar Badde) आणि खासगी व्यक्ती तानाजी श्रीपती मारणे Tanaji Shripati Marne (वय ४६, रा. इंदिरानगर, अप्पर सुपर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत एका ३९ वर्षाच्या धरणग्रस्ताने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांची टेमघर धरणामध्ये जमीन संपादन झाल्यामुळे त्यांनी शासनाकडून शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे शेतजमीन व घरासाठी २ गुठ्ठयांचा भुखंड दिला गेला आहे. तक्रारदाराच्या घरातील चार सदस्यांसाठी व त्यांच्या सख्ख्या भावाच्या घरातील सदस्यांसाठी चार असे एकूण ८ जणांचे आठ प्रस्ताव सुजाता बडदे यांच्याकडे प्रलंबित होते. या घराचे भुखंड मंजुर होण्यासाठी आठ प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, शिरुर यांच्या समोर ठेवून त्यांच्याकडून ते मंजूर करुन देण्यासाठी सुजाता बडदे हिने तक्रारदाराकडे प्रत्येक प्रस्तावासाठी सुरुवातीला ५० हजार रुपये असे आठ प्रस्तावासाठी एकूण ४ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार ४ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ७ फेब्रुवारी रोजी त्याची पडताळणी केली. त्यात सुजाता बडदे यांनी प्रत्येक प्रस्तावासाठी ४० हजार रुपये प्रमाणे ३ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम खासगी व्यक्ती तानाजी मारणे याच्याकडे देण्यास सांगितले. त्या प्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १० फेब्रुवारी रोजी पुणे शहरातील शिरुर उपविभागीय कार्यालय येथे सापळा रचला. लाच रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून तक्रारदार यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये स्वीकारताना तानाजी मारणे याला पकडण्यात आले. त्यानंतर सुजाता बडदे हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भोसले तपास करीत आहेत.
टेमघर धरणाचे काम १९९६ ते २०१० या दरम्यान करण्यात आले. २०१० मध्ये धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाली. ३.४ टीएमसी साठवण क्षमता धरणाच्या बांधकामासाठी २५३ कोटी खर्च करण्यात आले होते. धरणात पाणी साठविण्यास सुरुवात झाल्यानंतर भ्रष्ट्राचारामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याचे आढळून आले. याबाबत कृष्णा खोरे महामंडळाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी ४१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
१९९६ ते २०१० दरम्यान संपादन केलेल्या जमीनचा मोबदल्याबद्दल भुखंड मंजूर करण्यास अक्षम्य उशीर झाला असताना आता या भुखंड मंजुरीसाठी पुन्हा लाच देण्याची पाळी या धरणग्रस्तांवर आली आहे.