Pune Porsche Car Accident | ‘आमची अटक बेकायदेशीर, हे संविधानिक अधिकारांचे उल्लंघन’, कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातील अग्रवाल दाम्पत्याची याचिका

पुणे : Pune Porsche Car Accident | कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) आणि विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस. एम मोडक यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
खंडपीठाने या याचिकेसह अशाच प्रकारच्या ४० याचिका दोनपेक्षा जास्त न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठाकडे पाठविल्या आहेत. अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.
शिवानी अग्रवाल यांनी मुलाच्या ऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे समोर आले होते. तर विशाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी अग्रवाल यांचे रक्त घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र, अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नाही असे नमूद करत अग्रवाल दाम्पत्याचे वकील यांनी याचिका दाखल केली आहे.