Amravati Crime News | आई हळदी-कुंकवाला गेली तेव्हा गळा घोटला, पोलिसाच्या 26 वर्षीय मुलीची घरात घुसून हत्या, हत्येचं गूढ कायम

अमरावती : Amravati Crime News | गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जिजाऊ नगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा मृतदेह २८ जानेवारीच्या संध्याकाळी तिच्याच घरात सापडला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला, पण अजूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. संस्कृती संजय राऊत (वय-२६) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

दरम्यान पोलिसांनी राऊत कुटुंबासह संस्कृतीच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाचीही पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली. संस्कृतीला मोबाईलवर हाय मेसेज पाठवणाऱ्या तरुणाचीही पोलिसांनी चौकशी केली, पण पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेले नाही, त्यामुळे संस्कृतीच्या हत्येचे गूढ १० दिवसानंतरही कायम आहे.

संस्कृतीचे वडील संजय राऊत हे पोलीस कर्मचारी आहेत. २८ जानेवारीला संजय राऊत यांची मोठी मुलगी संस्कृती घरात एकटी होती. संस्कृतीची आई आणि छोटी बहीण परिसरामध्ये असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. दोघीही जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांना संस्कृतीच्या खोलीमध्ये तिचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळला. ओढणीच्या सहाय्याने संस्कृतीचा गळा घोटण्यात आला होता, तसेच तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्तही बाहेर आले होते.

या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र घटनेच्या तीन दिवसानंतर डॉक्टरांनी संस्कृतीचा प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना दिला. यात श्वास कोंडल्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृत्यूआधी संस्कृतीची कुणासोबत तरी झटापट झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. यानंतर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वत: घटनास्थळी भेट देऊन संस्कृतीच्या कुटुंबासोबत चर्चा केली. यानंतर गाडगेनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान संस्कृती राऊत हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात अमरावती पोलिसांना अजूनही यश आलेले नाही.