Dhankawadi Pune Crime News | महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये सतत वाद व्हायचे, नातेवाइकांकडूनही धमकी, 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला, खून झाल्याचा नातेवाईकांचा संशय

पुणे : Dhankawadi Pune Crime News | लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवार (दि.५) मध्यरात्री धनकवडीतील प्रियदर्शनी शाळेजवळील श्लोक बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला.
मयत तरुणाच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक तरुण अल्पवयीन आहे. मयत तरुणाचा नातेवाईक कुंदन बाबुराव आठवले यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार , सनी रमेश आठवले हा मागील वर्षभरापासून एका महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होता. मात्र या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. याशिवाय सनी ज्या महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते त्या महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते.
बुधवारी मध्यरात्री फिर्यादी यांना सनी आठवले ज्या मुली सोबत राहत होता तिने फोन केला आणि सनी याने गळफास घेतल्याची माहिती दिली. सुरुवातीला फिर्यादी यांचा विश्वास बसला नाही. त्यांनी सनी याच्या एका मित्राकडून माहिती घेतली असता हा प्रकार खरा असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी पुण्यात धाव घेतली. त्यांनी सनीच्या मृत्यूबाबत काही संशय व्यक्त केला आहे. सनीने आत्महत्या केली की घातपात झाला? याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. सहकारनगर पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.