Ramraje Naik Nimbalkar | फलटणमध्ये इन्कम टॅक्सची धाड, रामराजे निंबाळकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – काळजी नसावी…”

सातारा : Ramraje Naik Nimbalkar | माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बंधूच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सकाळी आयकर विभागाने छापा टाकला आहे.

“आम्ही कुठल्याही चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत. दोन नंबरचे धंदे केले नाहीत. त्यामुळे यामधून काही निष्पन्न होणार नाही”, असा विश्वास रघुनाथराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे रामराजे निंबाळकरांनी सोशल मीडियाला स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना काळजी करण्याचे कुठलेही कारण नसून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.

रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत. तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती केलेली कारवाई राजकीय द्वेशातून असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

आज (दि.५) सकाळी सहा वाजता आयकर विभागाचा छापा संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती पडला आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर केली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने पोलिसांनीही तगडा बंदोबस्त घराबाहेर तैनात केला आहे. अशातच ‘कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी’ अशी पोस्ट करत रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.