Dhananjay Munde News | धनंजय मुंडे आणखी अडचणीत, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल; निवडणूक शपथपत्रात या बाबी दडवल्याचा आरोप

Dhananjay-Munde

बीड : Dhananjay Munde News | सरपंच संतोष देशमुख खून (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणानंतर अडचणीत आलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. काल-परवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता मुंडे यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. निवडणूक शपथपत्रात काही महत्वाच्या गोष्टी लपवल्याचा गंभीर आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

सरपंच देशमुख खून प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत असलेले निकटचे तसेच आर्थिक संबंध समोर आल्याने मंत्री धनंजय मुंडे सध्या अडचणीत आले आहेत. त्यातच काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 88 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता.

यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध राजाभाऊ श्रीराम फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक बाबींची माहिती दडवल्याचा याचिकेत आरोप केला आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात दोन अपत्यांचा उल्लेख केला आहे. मात्र पत्नी करुणा मुंडे यांचा उल्लेख केलेला नाही.

तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर असलेली वाहने, फ्लॅट, विमा पॉलिसी, सोन्याचे दागिने, तसेच बँकेतील जॉईन अकाऊंट, मालमत्ता आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे याची माहिती दडवून आहे. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठाने मंत्री धनंजय मुंडे आणि इतर उमेदवारांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.