Creative Foundation Pune | कलाकारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्यच – संदीप खर्डेकर

Sandeep Khardekar (2)

समर्थ युवा प्रतिष्ठान,ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कलाकारांची मोफत आरोग्य तपासणी – योगेश सुपेकर

पुणे : Creative Foundation Pune | कलाकारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्यच असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. तसेच कलावंतांच्या थकीत निवृत्तीवेतनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून लवकरच ज्येष्ठ कलावंतांना थकीत निवृत्तीवेतन मिळवून देऊ असेही संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) म्हणाले.कलावंत हे चित्रपट, नाटक, सिरीयल च्या माध्यमातून समाजात मनोरंजनाचे महत्कार्य करत असतात व आपल्या जीवनात आनंद फुलवत असतात, मात्र उतारवयात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावेळी त्यांच्याप्रतीचे ऋण हे कर्तव्य म्हणून आपण फेडले पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा प्रतिष्ठान च्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून कलावंतांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, समर्थ युवा प्रतिष्ठान चे सुनील पांडे,राष्ट्रवादी काँग्रेस च्या चित्रपट आघाडीचे बाबासाहेब पाटील,ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर,कार्याध्यक्ष अविनाश खेडकर, उपाध्यक्ष गणेश गायकवाड,सचिव गणेश मोरे,खजिनदार रशीद शेख,उपसचिव अश्विनी कुरपे,उपखजिनदार मनोज माझीरे,संचालक सोमनाथ फाटके,राजरत्न पवार, आमिर शेख,प्रमुख सल्लागार संदीप पाटील, जितेंद्र भुरूक,विशेष सल्लागार अभय गोखले इ पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील सातत्याने ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ला मदत करत असून त्यांनी समूत्कर्ष च्या माध्यमातून ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या सभासद असलेल्या कलावंतांना दरमहा निम्म्या दरात किराणा सामान उपलब्ध करून दिला याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत असे फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर म्हणाले. आज मा. चंद्रकांतदादांनी आमच्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून जे नातं जोडलंय त्यामुळे आम्ही सर्व कलाकार कृतज्ञ असल्याचेही सुपेकर यांनी सांगितले.

ह्या शिबिरात रक्त तपासणी,तोंडाचा कर्करोग,स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, कोलेस्ट्रॉल, डोळे, दात, रक्तातील घटक तपासणी अश्या विविध तपासण्यांचा समावेश असून ह्या सर्व तपासण्यांसाठी साधारणत: 13500 रुपये खर्च येतो असे क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि समर्थ युवा प्रतिष्ठान चे सुनील पांडे यांनी सांगितले.

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ने केवळ पडद्यावरील कलाकारच नव्हे तर बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सिने नाट्य उद्योगाशी संबंधित सर्व घटकांच्या एकत्रीकरणावर आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला असल्याचे योगेश सुपेकर, रशीद शेख,गणेश मोरे,गणेश गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.कलाकारांनी ह्या शिबिरास भरभरून प्रतिसाद दिला आहे.