Bibvewadi Pune News | बिबवेवाडीत पुन्हा एकदा 25 ते 30 वाहनांची तोडफोड; वेल्ह्यातून तिघांना केली अटक; पोलिसांनी काढली गुडघ्यावर बसवून ‘धिंड’ (Videos)

पुणे : Bibvewadi Pune News | बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर, दुर्गामाता गार्डन, राजीव गांधीनगर परिसरात दहशत माजविण्यासाठी तिघांनी जवळपास २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली. पहाटे पावणे तीन वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. हातावर पोट असलेल्या लोकांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या तिघा समाजकंटकांना वेल्हा तालुक्यातील सापेगाव येथून अटक केली आहे.
अंडी ऊर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर अशी या तिघांची नावे आहेत.
बिबवेवाडी, पर्वती, जनता वसाहत परिसरात वारंवार वाहनांवर दगडफेकीचे प्रकार होत असतात. पहाटे ज्या ठिकाणी वाहनांवर दगडफेक केली गेली. त्याच भागात सहा महिन्यांपूर्वी वाहनांवर दगडफेक करुन मोठ्या प्रमाणावर नुकसान केले गेले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर परिसरात पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास तिघांनी रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो, कार, रिक्षा, दुचाकी यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन त्यांच्या काचा फोडल्या. एका पाठोपाठ एक वाहनांच्या काचा फोडत ते पुढे जात होते.
कारचालक जखमी
एका कारमध्ये चालक झोपला होता. या तिघांनी त्याच्या कारच्या काचावर त्यांनी कोयते मारले. त्यामुळे त्यांच्या अंगावर काचा पडल्या. काचा लागून त्यांच्या हाताला जखम झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हे टोळके पळून गेले होते. पोलिसांनी त्यांचा मागोवा घेऊन वेल्हा तालुक्यातील सापेगाव येथून तिघांना ताब्यात घेतले.
एकाच गाडी तिसर्यांदा फुटली
येथील एका कारवर या टोळक्याने कोयते मारुन तिच्या काचा फोडल्या. या कारच्या काचा फोडल्या जाण्याची ही तिसरी वेळ असल्याचे एका महिलेने सांगितले.
याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, बिबवेवाडी परिसरात पहाटेच्या सुमारास २५ ते ३० गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. ही तोडफोड करणार्या तिघांना पोलिसांनी वेल्हा तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.