Sunetra Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेच्या पहिल्याच टर्ममध्ये मोठी जबाबदारी, ‘या’ पदावर निवड, दादांचे दिल्लीतील वजन वाढले

नवी दिल्ली : Sunetra Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. त्यांची ही पहिलीच टर्म असली तरी मोदी सरकारने आता त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. या निवडीची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक्सवर अभिनंदनाची पोस्ट करून दिली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तालिका अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!
संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील लढतीत सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. नणंद-भावजय यांच्यातील हा सामना त्यावेळी कायम चर्चेत होता. मात्र सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर अजित पवारांनीही सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीत उतरून चूक केल्याचे म्हटले होते.
मात्र, पराभवानंतर काही दिवसांतच त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली. आता सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार असून आता तर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना तालिक अध्यक्ष पद मिळाले आहे. खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीत जनपथ मार्गावरील 11 क्रमाकांचा बंगला देण्यात आला आहे. याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थाने आहेत.