Banpuri Satara Accident News | पुतण्याच्या साखरपुड्याला जाताना काळाचा घाला, भरधाव कारची दुचाकीला धडक, वडिलांचा जागीच मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी; दोन महिन्यांपूर्वीच पत्नीचेही निधन

सातारा : Banpuri Satara Accident News | भरधाव कारची दुचाकीला धडक बसून यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वाराची मुलगी जखमी झाली आहे. हा अपघात ढेबेवाडी- सनपुर महामार्गावर बनपुरी येथे (दि.३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. पांडुरंग बाबूराव एकावडे (वय-५१, रा. एकावडेवाडी सळवे, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे. रेश्मा मानाजी रोडे (वय-२६, रा. रोडेवाडी- मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण) या जखमी झाल्या आहेत. एकावडे आपल्या मुलीला घेऊन पुतण्याच्या साखरपुड्याला निघालेले असताना हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकावडेवाडी (सळवे) येथील पांडुरंग एकावडे यांच्या पुतण्याचा कळकेवाडी (ता. पाटण) येथे साखरपुडा असल्याने ते त्यांच्या विवाहित मुलगी रेश्मा मानाजी रोडे (वय २६, रा. रोडेवाडी- मंद्रुळकोळे खुर्द, ता. पाटण) यांना घेऊन दुचाकीवरून (एमएच ५० डब्ल्यू ५३९४) कळकेवाडीला निघाले होते. ढेबेवाडी- सणबूर मार्गावर बनपुरी गावाजवळ आल्यावर समोरून आलेल्या कारने (एमएच ०३ ए डब्ल्यू ७०७०) दुचाकीला जोराची धडक दिली.

यात दुचाकीवरील दोघेही उडून बाजूला पडले. एकावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रेश्मा यांनाही अपघातात मार बसला होता. नागरिकांनी जखमींना तत्काळ कऱ्हाड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पांडुरंग एकावडे यांचा मृत्यू झाला. जखमी रेश्मा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातात कार व दुचाकीच्या दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.

पांडुरंग एकावडे हे दुबईत एम्ब्रॉयडरीचे काम करत होते. पत्नीच्या आजारपणामुळे काही महिन्यांपासून ते गावीच होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. श्री. एकावडे यांचा गावाकडे सामाजिक, धार्मिक कार्यातून हिरिरीने सहभाग असायचा. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, आई, दोन भाऊ असा परिवार आहे. आईपाठोपाठ वडिलांचाही मृत्यू झाल्याने भावंडे पोरकी झाली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.