Pune Rural Police News | गोध्रा हत्याकांडातील जन्मठेपेचा फरार कैद्याची टोळी जेरबंद; आळेफाटा पोलिसांची कामगिरी, गोध्रा, नाशिक, पुण्यासह 16 गुन्हे दाखल (Video)

पुणे : Pune Rural Police News | गोध्रा येथील हत्याकाडांत जन्मठेपेची शिक्षा झाली असताना पॅरोल रजेवर असताना कारागृहात परत न जाता टोळी बनवून लुटमार करत होता. सलीम ऊर्फ सलमान युसुफ जर्दा (वय ५५) असे या फरार कैद्याचे नाव असून आळेफाटा पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर आळेफाटा, मंचर, सिन्नर, गोध्रा, राव पुरा, साबरमती (गुजरात), देलवाडा (राजस्थान) येथील १६ गुन्हे दाखल आहेत.

सोमनाथ गायकवाड (वय ३०, रा. पंढरपूर) हे आयशर टेम्पोमध्ये भिवंड येथील जे के टायर्स अँड इंडस्ट्रील लि़ या कंपनीच्या गोदामातून १६५ टायर घेऊन सोलापूरला जात होते. ७ जानेवारी रोजी पहाटे त्यांना झोप येऊ लागल्याने पहाटे तीन वाजता ते आळे फाटा परिसरातील आणे गावाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाचे आतील मोकळया जागेत टेम्पो लावून झोपी गेले. सकाळी सात वाजता उघडल्यावर त्यांच्या टेम्पोच्या पाठीमागील ताडपत्री व रस्सी तोडून गाडीच्या आतील लहान १८ व मोठे २२ टायर असा २ लाख ४९ हजार ६२२ रुपयांचा माल चोरुन नेला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना मंचर व सिन्नर पोलीस ठाण्यांमध्येही अशाच प्रकारे ढाबे व पेट्रोलपंपावर थांबलेल्या ट्रक, टेम्पोची ताडपत्री फाडून माल चोरुन नेल्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. या गुन्ह्यांचा अभ्यास केल्यावर असे गुन्हे करणारी टोळी गुजरातमधील गोध्रा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून या टोळीच्या टेम्पोचा क्रमांक मिळविला. त्यांचा शोध घेत असताना आयशर टेम्पो चांदवड येथे आरोपींसह मिळाला.

सलीम ऊर्फ सलमान युसुफ जर्दा (वय ५५), साहील हनीफ पठाण (वय २१), सुफीयान सिकंदर चॅदकी (वय २३), आयुब इसग सुनठीया (वय २९), इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१, सर्व रा. गोध्रा पंचमहाल, गोध्रा, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आळेफाटा, मंचर तसेच सिन्नर येथे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेला आयशर टेम्पो तसेच गुन्ह्यात चोरीला गेलेला १४ लाख ४० हजार ८७८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या टोळीवर १६ गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सलीम ऊर्फ सलमान जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर बाहेर आला. त्यानंतर रजा संपल्यावर कारागृहात न जाता त्याने टोळी बनवली. त्यानंतर तो अशा प्रकारे चोर्‍या करीत होता.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस अंमलदार अमित माळुंजे, नविन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांनी केली आहे.