Lonavala Pune Crime News | लोणावळ्यातील बंगल्यात जुगार खेळणे पडले महागात ! अंमली पदार्थांची विक्री करणारे अटकेत, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची कारवाई, 3 कारवायात 16 अटक (Video)

पुणे : Lonavala Pune Crime News | लोणावळ्यातील तुंर्गालीमधील एका बंगल्यात जुुगार खेळणे महागात पडले. पोलिसांनी तेथे छापा घालून जुगारीचे साहित्यासह ४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तर मुंबईला अंमली पदार्थ घेऊन जाणार्यांना पकडून त्यांच्याकडून १५ किलो गांजा जप्त केला आहे. तीन कारवायांमध्ये १६ जणांना अटक केली असून ५ लाख ८३ हजार ९६२ रुपयांचा माल जप्त केला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना बातमी मिळाली की, तुंर्गाली येथील जोशवुड बंगल्यात काही जण जुगार खेळत आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातल. तेव्हा १३ जण जुगार खेळत होते. अविनाश प्रकाश लोहार (वय ३२, रा. हडको कॉलनी, लोणावळा), आकाश दशरथ परदेशी (वय ५२, रा. गवळीवाडा, लोणावळा), बाजीराव गंगाराम मावकर (वय ३९, रा. तुंर्गाली, लोणावळा), शेखर रामदास बोडके (वय ३०, रा. न्यू तुंर्गाली, लोणावळा), सूरज गणपत लोहट (वय २७, रा. गवळीवाडा, लोणावळा), अजय गजानन घाडी (वय ५८, रा. कामशेत), संजय प्रभाकर कदम (वय ५९, रा. खंडाळा, लोणावळा), शंकर वसंत सकट (वय ३५, रा. भास्कर नगर, अंबरनाथ, ठाणे), विनोद मारुती धुळे (वय ४४, रा. बारा बंगला, लोणावळा), मकदूम गनी शेख (वय ३३, रा. देहूरोड), सिरिल सॅमसुंदर मोजेस (वय ४८, रा. देहूरोड), सागर श्याम पवार (वय ३५, रा. गवळीवाडा, लोणावळा), विकास भिमाजी पैलवान (वय ३२, रा. गवळीवाडा, लोणावळा), जोशवुड बंगला मालक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. १३ जणांना जुगार खेळण्यासाठी बंगला उपलब्ध करुन दिल्याबद्दल जोशवुड बंगला मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात जुगाराच्या साहित्यासह ४ लाख ८ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना बातमी मिळाली होती की, युनिकॉर्न मोटारसायकलवर संभाजीनगरहून दोघे जण अंमली पदार्थाची विक्रीसाठी मुंबईला जात आहे. पोलिसांनी वरसोली टोलनाक्याजवळ नाकाबंदी लावली. बातमीप्रमाणे पहाटे ५ वाजता मोटारसायकलवरुन आलेले दोघे जण मिळाले. अक्षय गोपीनाथ जाधव (वय २५), प्रल्हाद आसाराम जाधव (वय ३४, दोघेही रा. आसे गाव, गंगापूर, जि. संभाजीनगर) यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडील सॅकमध्ये ६० हजार ५१२ रुपयांचा बिया बोंडासह असलेला १५ किलो ओला गांजा मिळाला. त्याबरोबर एक लाख रुपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
लोणावळा येथे एक जण मेफेड्रॉन पावडरची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ताबान जायर पठाण (वय २८, रा. इराणी चाळ, लोणावळा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १५ हजार रुपयांची ३.६२ ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन पावडर सापडली. या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण १६ आरोपी अटक केले असून ५ लाख ८३ हजार ९६२ रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार, अमोल तावरे, पारधी यांनी केली आहे.