Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | शेततळ्यात उडी घेऊन तरुणाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये सततची नापिकी, मराठा आरक्षणाचा उल्लेख

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | सिल्लोड तालुक्यातील खूपटा गावामधील ३८ वर्षीय तरुणाने सततची नापिकी, मराठा समाजाला अनेक मोर्चे आंदोलने, उपोषणे करून आरक्षण मिळत नसल्याने स्वतः च्या शेतातील शेततळ्यात उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. समाधान रायभान काळे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.३१) रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घरातून कुणालाही न सांगता निघून गेले. सकाळ झाली तरी अजून घरी आले नाहीत म्हणून नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र समाधान कुठेच आढळून न आल्याने त्यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात पायातील चप्पल तरंगत असल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्यांनी शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. शेततळ्यात पाणी खूप असल्याने मृतदेह बाहेर काढायला अडचण येत होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथून अग्नीशामक दलाच्या रेस्क्यू टीमला बोलवून मृतदेह गळाच्या साह्याने बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पंचनामा करीत असताना समाधान यांच्या खिशात सुसाईट नोट मिळून आली.

त्यामध्ये लिहून ठेवले होते की , सततची नापिकी, शेकडो मोर्चे, आंदोलने करुनसुद्धा मराठा समाजाला न मिळणारे आरक्षण व सरकार मराठा समाजाची करीत असलेली फसवणूक या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. आता तरी सरकारने डोळे उघडून गरजवंत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. एक मराठा लाख मराठा, अशा आशयाची चिठ्ठी मिळून आल्याने मराठा समाजातून रोष व्यक्त होत आहे.