Anjali Damania | फडणवीस-पवारांना दिलेली मुदत संपली, आता अंजली दमानिया उचलणार हे पाऊल, उद्या करणार खुलासा…

मुंबई : Anjali Damania | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी परळीच्या थर्मल पावर प्रकल्पाच्या राखेतून मंत्री धनंजय मुंडे, त्यांची पत्नी आणि संरपंच देशमुख खून प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांनी कोट्यवधी रूपये कसे कमावले याचे पुरावे राष्ट्रवादीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते, मात्र फडणवीसांशी बोलून निर्णय घेतो, असे म्हणणार्या दादांनी घुमजाव केल्याने दमानियांनी चार दिवसांची मुदत दिली होती, ही मुदत संपल्याने आता त्यांनी उद्या मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, राज्य सरकारला मी चार दिवसांचा वेळ दिला होता. चार दिवसांमध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे होता. परंतु सरकारने राजीनामा घेतला नाही. या चार दिवसांमध्ये मी आणखी पुरावे गोळा केले असून उद्या सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडेंबद्दल मोठा खुलासा करणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. मात्र धनंजय मुंडे दोघांचे अतिशय जवळचे असल्यामुळे धनंजय मुंडेंवर कारवाई होत नाही. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय होणार नाही.
धनंजय मुंडे हे मंत्री म्हणून मला मान्य नाहीत. जे लोक दहशतवाद करतात, अत्याचार करतात, वाल्मिक कराड आणि कैलास फडसारख्या लोकांना मोठे करतात, अशा लोकांना विधानसभेत बसणार असतील तर आम्हाला मान्य नाही, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.
दमानिया पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांचा राख घोटाळा, बँक खात्यातील काळापैसा, एका मंत्राला सरकारी कंपनीतून फायदा कसा झाला, हे दाखवले. त्यांच्या जमिनी दाखवल्या. त्यांचे आर्थिक व्यवहार दाखवले, त्यांची आणि वाल्मिकी कराडची जवळीक दाखवली, पण काहीही झाले नाही.
अंजली दमानिया म्हणाल्या, मी उद्याच्या पत्रकार परिषदेत यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो त्याचा खुलासा करणार आहे. तसेच हे पुरावे मी भगवानगडावर देणार आहे, आणि मागणी करणार आहे की तुम्ही मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. दुसरी मागणी अशी असेल की मी दिलेले पुरावे तुम्हाला जर योग्य वाटले, तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची तुम्हीच मागणी करावी. असे जर झाले तर पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला नमन करेल.
अंजली दमानिया म्हणाल्या, नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांच्या पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यात जी विघ्न आहेत ती दूर करावी. यापैकी सर्वात मोठे विघ्न म्हणजे धनंजय मुंडे आहेत. ते मंत्रिपदावर असेपर्यंत न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे काम आता भगवानगडानेच करावे. तरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असे दमानिया म्हणाल्या.