Sanjay Shirsat On Eknath Shinde-Uddhav Thackeray | राजकीय वर्तुळात रंगली मोठी चर्चा, शिंदे-ठाकरे एकत्र येण्याबाबत शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे वक्तव्य

मुंबई : Sanjay Shirsat On Eknath Shinde-Uddhav Thackeray | सध्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे सेना विरूद्ध शिंदे सेना कुरघोड्या देखील सुरू झाल्या आहेत. अशा वेळी शिंदेंच्या शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावर भाष्य करतानाच आपले भावनिक मत देखील व्यक्त केले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
शिवसेनचे दोन भाग झालेत, याचे कधी दु:ख होते का? या प्रश्नावर संजय शिरसाट म्हणाले की, फार दु:ख होते. मला आजही हे आवडत नाही. आजही मनाला यातना होतात. ठाकरे गटातील नेता किंवा पदाधिकारी भेटतात, त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे. मात्र, मनामध्ये जे अंतर पडले आहे, तो त्या पक्षात, मी या पक्षात असे जे झाले आहे हे आवडत नाही.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, सत्तेत जाण्यासाठी त्यांची (उद्धव ठाकरे यांची) जी काही धडपड सुरु होती, त्याच धडपडीचा परिणाम झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्वात जास्त त्रास शिवसेना प्रमुखांना दिला होता. त्यामुळे शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जायचे नाही. मात्र, जेव्हा सत्तेसाठी जे पाऊल उचलले गेले तेव्हाच पक्षाचा र्हास होईल असे वाटले होते.
दोन्ही शिवसेना किंवा दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे असे वाटते का? तसेच जर कधी आपुलकीने बोलायची आणि एकत्र आणण्याची संधी आली तर तुम्ही प्रयत्न करणार का? यावर शिरसाट म्हणाले, आपुलकीने बोलायची आणि एकत्र आणण्याची संधी आली तर मी प्रयत्न करेन. पण दोघांची तार जुळली पाहिजे. त्या दोघांची तार जुळत असेल तर त्यासाठी माझा अक्षेप नाही.
शिरसाट म्हणाले, ज्यांचे कधी तोंड पाहण्याची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर ते जाऊन बसले. आमची चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. एकदा जर त्या तारा जुळल्या तर कोणत्याही गोष्टीला हरकत नाही. मात्र, हे होईल की नाही हा खरा प्रश्न आहे. तसेच प्रयत्न हा एका बाजूने होऊन चालत नाही.
शिरसाट म्हणाले, आज त्यांची अवस्था काय आहे याचेही भान ठेवले पाहिजे. एकत्र यायला हरकत नाही. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेईल? हे देवालाच माहिती. जर पुढाकार घेतला आणि विचारांची एक वाक्यता आली तर काहीही गैर राहणार नाही.