Palghar Crime News | शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या सख्ख्या भावानेच केल्याचे उघडकीस, पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

पालघर : Palghar Crime News | पालघरचे बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची हत्या त्यांच्या सख्ख्या भावानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईवरून परत येत असताना त्यांच्या लहान भावाने त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. अशोक धोडी हे २० जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी या बाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
तपासादरम्यान, पालघर पोलिसांना गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरिग्राम परिसरातील एका बंद दगडखाणीत ४० फूट खोल पाण्यात अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळली. पुढील तपासात ही हत्या कौटुंबिक वादातूनच त्यांच्या भावाने केल्याचे उघड झाले.
अशोक धोडी आणि त्यांच्या भावामध्ये गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू होते. आरोपी अविनाश धोडीचा अवैध दारू तस्करीचा व्यवसाय चालवत होता. या धंद्यात अशोक धोडी अडथळा ठरत असल्यानेच त्यांचे अपहरण करून हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी अविनाश धोडीसह अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध पालघर पोलीस घेत आहेत.