Guillain Barre Syndrome | दिलासादायक बातमी! 6 वर्षाच्या मुलाची जीबीएस वर मात, समोसा खाल्ल्याने झालेली आजाराची लागण

पुणे : Guillain Barre Syndrome | राज्यात जीबीएस आजाराच्या नवीन १० रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ही आता १४० वरती पोहोचली आहे. यापैकी ७८ रुग्ण पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित २६ रुग्ण पुणे महापालिका, १५ पिंपरी-चिंचवड महापालिका, १० रुग्ण पुणे ग्रामीण मधील आहेत. तर इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या ११ इतकी आहे. (GBS In Pune)
एकूण रुग्णांपैकी ४५ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, तर १८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आत्तापर्यंत २५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर मृतांची संख्या ५ वर पोहोचली आहे. यामुळे चिंता वाढत असली तरी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड मधील ६ वर्षाच्या मुलाने जीबीएस वर यशस्वीरीत्या मात केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील ६ वर्षीय मुलाला काही दिवसांपासून त्रास होऊ लागला होता. त्याला पेन्सिल देखील हातात पकडता येत नव्हती. बाहेर खाल्ल्यामुळे त्याला जुलाबाचा त्रास झाला आणि तापही आला. दोन-तीन दिवसानंतर तो अंथरुणातून उठून शौचास जाताना देखील धडपडू लागला. त्यानंतर १४ जानेवारी रोजी आपल्या लहान भावासोबत खेळत असताना तो खाली पडला आणि त्याला पुन्हा उठून उभे देखील राहता येत नव्हते. त्यानंतर त्याला तातडीने औंध मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यावेळी जीबीएस आजाराचे निदान झाले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी आता त्याने जीबीएसवर यशस्वी मात केली आहे. तो आता पुर्णपणे बरा झाला आहे.
संबंधित मुलाच्या पालकांनी सांगितले की , आठवड्यापूर्वी जवळच्या दुकानातून समोसे आणून खाल्ल्यानंतर मुलाला ताप आला आणि जुलाब झाले. संपूर्ण कुटुंबाला तसाच त्रास झाला होता. परंतु, सहा वर्षाच्या मुलाचा ताप तसाच कायम राहिला. त्याने काही दिवसांनी पाय दुखत असल्याचे सांगितले होते. बालवाडीत शिकणाऱ्या मुलाच्या शारीरिक हालचालींमध्ये बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्याला औंधमधील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी एमआरआय आणि नर्व्ह कंडक्शन व्हिलॉसिटी टेस्टसह काही चाचण्या केल्या. या चाचण्यांमुळे त्याच्यामध्ये जीबीएस या दुर्मीळ न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले. त्याला व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. फुप्फुसांमध्ये थेट ऑक्सिजन पोहचण्यास मदत करण्यासाठी त्याच्या तोंडावाटे नळी टाकण्यात आली. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करत मुलावर यशस्वी उपचार करून त्याला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.