Dhananjay Munde | हे संकट 53 दिवसांपासून, इलेक्ट्रॉनिक-सोशल मिडियात ट्रायल, पण आता भगवानगड पाठीशी : धनंजय मुंडे

Dhananjay-Munde (2)

बीड : Dhananjay Munde | भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी संतोष देशमुख खुन प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. यानंतर पत्रकारांशी मुंडे यांनी संवाद साधताना म्हटले की, माझ्यावरील हे संकट 53 दिवसांपासून आहे. मला टार्गेट करण्यात येत आहे. त्यात भगवान गड पाठीशी उभा राहिल्याने निश्चित जबाबदारी वाढली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की, भगवान गड माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे. यासारखी ताकद आणि न्यायाचार्यांचा इतका मोठा विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. भगवान गड माझ्या पाठीशी संकटात उभा आहे. ही माझ्यासाठी शक्ती आहे. या शक्तीचे वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याची फार मोठी जबाबदारी टाकली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, मी मंत्री झाल्यानंतर भगवान गडावर आलो नव्हतो, काल रात्री येथे आलो, दर्शन घेतले. आता मुंबईला जात आहे. अनेक वर्षानंतर भगवान गडावर मुक्कामाला आलो. आज 53 दिवस झाले, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया मला टार्गेट करून मिडिया ट्रायल चालवली जात आहे. यात कधीही मी अवाक्षर बोललो नाही. भगवान बाबांचे दर्शन झाल्यानंतर शक्ती, प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांसाठी लढण्याची ताकद मिळते, असे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, न्यायाचार्य बाबांसोबत मी कधीही राजकीय चर्चा केली नाही. जी काही चर्चा होते ती अध्यात्मावर होती. ज्ञानेश्वरीतील अनेक अनुभव सांगतात ते ऐकल्यानंतर त्यातून आपल्याला काहीतरी मिळते. स्वत:चे आणि लाखो लोकांचे जीवन चांगले बनण्यासाठी उपयुक्त ठरते.

संतोष देशमुख यांची जी काही हत्या झाली, त्या हत्येतील आरोपींना फासावर लटकवले पाहिजे. यात जे कुणी दोषी असतील कुणालाही सोडू नये. शासन झाले पाहिजे ही पहिल्या दिवसापासून भूमिका आहे.

काही जण राजकारण करत असतील ते माझा राजीनामा घेण्यासाठी आहे की संतोष देशमुख यांच्या गुन्हेगारांना फासावर लटकवण्यासाठी आहे. माझा राजीनामा घेऊन एखाद्या समाजाला टार्गेट करून फायदा घ्यायचा हा ज्याचा त्यांचा हेतू असेल, असा आरोप मुंडे यांनी केला.