HV Desai College News | हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात देसाई करंडक 2024-25 स्पर्धांचे उद्घाटन

पुणे : HV Desai College News | द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी देसाई करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांचे उद्घाटन एम. इ. एस. सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांच्या शुभहस्ते पार पडले.

‘देसाई करंडक’ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक आणि बिगरतांत्रिक अशा विविध प्रकारच्या १२ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र आणि गुजरातचे सांस्कृतिक संमिश्रण’ हा यंदाच्या स्पर्धेचा मध्यवर्ती विषय घेण्यात आला आहे. इंदिरा कॉलेज, सरहद कॉलेज, एस. पी. कॉलेज, मॉडर्न कॉलेज, अण्णासाहेब मगर कॉलेज, एमआयटी आळंदी, पूना कॉलेज यांसोबतच पुण्यातील विविध १७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे. प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेच्या मध्यवर्ती विषयाचे कौतुक करतानाच महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून आपण घेत असलेल्या शिक्षणाचे दैनंदिन जीवनात सहजतेने कसे उपयोजन करावे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांनी आपल्या उद्बोधनात शताब्दीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मंडळाच्या आगामी उपक्रमांबद्दल सांगतानाच पुढील वर्षी देसाई करंडक अंतर्गत या प्रकारच्या स्पर्धांसोबतच विविध मैदानी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येईल, अशी माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अशा प्रकारच्या स्पर्धांचे असणारे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी दि पूना गुजराती केळवणी मंडळ चे चेअरमेन डॉ. राजेश शहा यांना नुकतीच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी मिळाल्याबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या उद्घाटन समारंभास सुमारे ९०० विद्यार्थ्यांसोबतच द पूना गुजराती केळवणी मंडळाचे सचिव श्री. हेमंत मणियार व सहसचिव श्री. दिलीप जगड हे मान्यवर देखील उपस्थित होते. प्रा. मोनिका धोत्रे आणि प्रा. शैलजा गुजराथी यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन केले आहे.