GBS In Pune | जीबी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर IND Vs Eng T-20 सामन्यापूर्वी एमसीए कडून महत्वाच्या सूचना; गहुंजे स्टेडियमवर होणार सामना

पुणे : GBS In Pune | राज्यभरात जीबी सिंड्रोम आजाराची लागण प्रचंड वेगाने होत आहे. अशातच या आजाराचे प्रमाण पुण्यात जास्त आहे. आतापर्यंत पुण्यात या आजाराचे १११ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील स्टेडियमवर ३१ जानेवारीला भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील चौथा सामना रंगणार आहे.
या सामन्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनद्वारे महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यात वाढणाऱ्या जीबी सिंड्रोम आजारापासून संरक्षणासाठी असोसिएशनकडून काळजी घेतली जाणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, स्टेडियममध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना मोफत स्वच्छ पाणी दिले जाणार आहे.
असोसिएशनचे सहसचिव संतोष बोबडे म्हणाले, ” शहरात आजाराचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार आहे. सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी प्रेक्षकांना शुद्ध पाणी मोफत दिले जाणार आहे.
पार्किंगची गैरसोय न होण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ४५ एकर जागा पार्किंगसाठी घेतली आहे. प्रेक्षकांसाठी मोफत पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून सोशल मीडियावर यासंबंधित सर्व माहिती शेअर करण्यात आली आहे. प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये याची संपूर्ण काळजी एमसीएकडून घेतली जाणार आहे'”, अशी माहिती बोबडे यांनी दिली आहे.