Pimpri Chinchwad Police | पुणे: पिंपरी चिंचवड पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश (Video)

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालविणारे जेरबंद; झारखंड, गुजरात, उडिसा येथील आरोपी पुण्यातून पाठवितात कंबोडियाला बँक खात्यांची माहिती
पुणे : Pimpri Chinchwad Police | पुणे परिसरातून शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी लागणारे बँक खात्याचे रॅकेट चालविणार्या झारखंड, गुजरात, उडिसा येथील ६ जणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. पुणे परिसरातून हे सर्व जण कंबोडिया येथील मुख्य सायबर चोरट्याला बँक खात्यांची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीने कंबोडिया येथील बसलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला हजारो बँक अकाऊंट दिल्याचे दिसून येत आहे. या आरोपींकडे मिळून आलेल्या अकाऊंटवर भारतभरात एकूण १०२ तक्रारी असल्याचे दिसून आले आहे. (Pimpri Cyber Police)
सायबर पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यामधील फिर्यादी यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन आरोपींनी ऑनलाईन व्हॉटसअॅप ग्रुप फुचर आऊटलुट व व्हीआयपी ३७ या व्हॉटसअॅप गु्रुपमध्ये अॅड करुन त्यांचे कंपनीची वेबलिंक व अॅप्लिकेशनची लिंक पाठविलेले लिंकवरुन त्यांचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यामार्फतीने वेगवेगळ्या बँक अकाऊंटला ७ लाख ६० हजार रुपये भरायला सांगून फसवणूक केली होती.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस हवालदार खरात यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की शुभम मोहन लोंढे (वय २४, रा. गोसावीनगर, पाटीलनगर, चिखली) हा सायबर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे बँक अकाऊंट देण्याचे काम करत आहे. शुभम लोंढे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात गुन्ह्यातील अकाऊंट हे सॅम ऊर्फ डेव्हिड याला दिले असल्याचे सांगितले. सॅम ऊर्फ डेव्हिड हा २ वर्षापासून भारतातील विविध ठिकाणच्या अकाऊंट धारकांशी टेलिग्रामद्वारे संपर्क साधून त्यांना प्रलोभने दाखवून त्यांचे अकाऊंट त्याच्यासोबत काम करणार्या कंबोडिया येथील मुख्य आरोपीस देत असे, अशी माहिती मिळाली. सॅम हा १५ ते २० पेक्षा जास्त मोबाईल नंबर वापरत असल्याचे दिसून आले. त्या सर्व १५ ते २० मोबाईलचे अॅनालिसस केले असता तो गोवा येथे असल्याचे व भारतभर फिरत असल्याचे दिसून आले. २३ जानेवारी रोजी तो पुण्यात येणार असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला हिंजवडी भागात पकडले. त्याचे खरे नाव सॅम ऊर्फ डेव्हिड ऊर्फ संबोधकुमार श्रीपती नायक (वय २२, रा. राऊलकिला, उडिसा) असे असल्याचे निष्पन्न झाले. तो महाराष्ट्रात बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी व शिक्षण घेण्यासाठी ४ वर्षापूर्वी मुंबईत आला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता तसेच त्याचे मोबाईल तपासणी केली असता तो पुणे जिल्ह्यातील ७ ते ८ ठिकाणी हॉटेलवर रुम बुक करुन सायबर गुन्ह्यांसाठी वापरण्यात येणारे बँक अकाऊंट धारकांना ठेवल्याचे निष्पन्न झाले.
हे अकाऊंट धारक व आरोपींचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी व पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण यांची २ पथके तयार करण्यात आली. या पथकाने पिंपरी चिंचवड हद्दीजवळील भुगाव, घोटावडे, भुकुम, बावधन, हिंजवडीमधील हॉटेल वर जाऊन ५ अकाऊंट धारकांना चौकशीकामी ताब्यात घेतले असता या हॉटेलवर त्यांच्यावर वॉच ठेवणारे गेट कीपर पण त्यांच्यासोबत मिळून आले. या अकाऊंट धारकांकडून ट्रॅप लावला जाऊ नये, अथवा हे आरोपी पकडले जाऊ नयेत, म्हणून ते वॉचर मार्फत बँक किट ताब्यात घेऊन पोर्टर अॅपद्वारे ते आरोपी रहात असलेल्या बावधन येथील फ्लॅटवर पाठवत असते.
बावधन येथील फ्लॅटवर राजअंश सिंग संतोष सिंग (वय २१, रा. संगीता हाईटस, भुगाव, मुळ रा. हजारीबाग, झारखंड), हा आरोपी सर्व किट जमा करुन कंबोडिया येथील आरोपीने पाठविलेली एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन व सायबर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बँक अकाऊंटला लिंक मोबाईलचे सिमकार्ड एपीके फाईल डाऊनलोड असलेल्या मोबाईलमध्ये टाकत असे. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी ४ ते ५ सायबर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बँक अकाऊंट होल्डरचे लिंक मोबाईल व सीम घेऊन आरोपी जोपर्यंत त्या अकाऊंटवर ट्रान्झिक्शन चालू आहेत व ओटीपी फॉरवर्ड होत आहेत, तोपर्यंत आरोपी प्रोफेसर ऊर्फ हिमांशकुमार गणेश ठाकूर (वय २४, रा. विलेज कुद, पो. रेवाली, हजारीबाग, झारखंड) हा अकाऊंटधारक व पोलिसांना लोकेशन मिळून येणार नाही, म्हणून दिवसभर पुणे शहर परिसरात फिरत असे.
सॅम ऊर्फ डेव्हिड ऊर्फ संबोधकुमार श्रीपती नायक याच्या चौकशीमध्ये तो मागील २ वर्षांपासून कंबोडिया देशातील आरोपीसोबत हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यासोबत गुजरातमधील वलसाड येथून अकाऊंट पुरविणारे गौरव अनिल शर्मा (वय ४०, रा. टिफिन सर्व्हिस, वलसाड) व अकाऊंट धारक अंकुश रामराव मोरे (वय ३१, रा. सेरीन मेडोज, गंगापूर खेड, नाशिक) यांचे सह ६ आरोपींकडून ९ मोबाईल, १ टॅब, १० चेक बुक सहीत अटक करण्यात आली आहे.
या आरोपी आजपर्यंत कंबोडिया येथे बसलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीला हजारो बँक अकाऊंट दिल्याचे दिसून येत आहे. तसेच आरोपीकडे मिळून आलेल्या अकाऊंटवर भारत भरात एकूण १०२ तक्रारी असल्याचे दिसून आले आहे.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कृत अॅप्लीकेशनचा वापर करावा़ शेअर मार्केट गुंतवणुक करण्यासाठी सेबी पुरस्कृत अॅप्लीकेशन हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगत नाहीत़ शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करताना आपण बनावट प्लॅटफॉर्मवर गुंतवणुक करत नाहीत ना याची खात्री करावी, कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बँक अकाऊंट वैयक्तिक माहिती शेअर करु नये.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, श्रीकांत कबुले, विशाल निचीत, स्वप्निल खणसे, सुभाष पाटील, नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, प्रिया वसावे, प्रितम भालेराव, सरीता तुपे, धरती वाडेकर, ईश्वरी आंबरे, मोनिका चित्तेवार, महेश मोटकर, सुरज शिंदे, टेकाळे, सुरंजन चव्हाण, दिपाली टोपे, दिपाली चव्हाण यांनी केली आहे.