Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या दिल्लीत गाठीभेटी, राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढला, पण प्रतिक्रिया देताना म्हणाले…

Dhananjay-Munde (2)

नवी दिल्ली : Dhananjay Munde | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात निकटचे आणि व्यावसायिक संबंध असल्याचे पुरावे अजित पवार यांना दिले आहेत. यानंतरही मुंडे यांचा राजीनामा घेण्यास फडणवीस आणि पवारांनी नकार दिला. सत्ताधारी नेतेच अशाप्रकारे नैतिकता पायदळी तुडवत असल्याने एकीकडे संताप व्यक्त होत असताना दुसरीकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने मुंडे हे दिल्लीच्या दौर्‍यावर गेले आहेत.

दिल्ली दौर्‍यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांना, नैतिकता म्हणून आपण राजीनामा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याच्या मागणीचा वाद थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे टोलवला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी राजीनामा देण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगू शकतील. 51 दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.

नैतिकता दाखवत राजीनामा देणार का, असा प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे म्हणाले, माझी नैतिकता माझ्या लोकांबाबत प्रामाणिक आहे. मी जे बोलतो, ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतो. मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही, असे मला वाटते. जर दोषी असेल तर माझे वरिष्ठ मला तसे सांगतील.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे हे नैतिकता न दाखवता राजीनाम्यास टाळाटाळ करत असल्याने विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, आमच्या सरकारच्या काळात अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ यांना केवळ ऐकीव माहितीवर अटक केली होती. वर्ष-वर्ष ते तुरुंगात होते.

आतातर सत्तेत असलेले आमदारही टीव्हीवर रोज पुरावे देत असतानाही राजीनामा दिला जात नाही. माझ्यामुळे जर 50 दिवस पक्षाची रोज बदनामी होत असती तर मी स्वतःहून राजीनामा दिला असता. मी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नसती, असे सुळे म्हणाल्या.