Bapu Pathare MLA | निरगुडी व वडगाव शिंदे येथे वन उद्यान उभारा; बापूसाहेब पठारे यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणीचा प्रस्ताव सादर

मुंबई : Bapu Pathare MLA | वडगावशेरी मतदारसंघातील (Vadgaon Sheri Assembly) निरगुडी व वडगाव शिंदे या गावात असलेल्या वनविभागाच्या जागेत नागरिक बांधवांच्या सुख-सोयीसाठी व येणाऱ्या काळात पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे वन उद्यान विकसित व्हावे, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली.

मुंबई येथे काल (ता. २९) बापूसाहेब पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान, निरगुडी व वडगाव शिंदे गावात वन विभागाच्या जवळपास २२९ हेक्टर जागेत वन उद्यान उभारण्याच्या संदर्भाने विस्तृत चर्चा पार पडली. अजित पवार यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

मौजे निरगुडी येथील गट क्र. ५३, १३६ व १६३-अ मध्ये वनविभागाची २२९ हेक्टर जागा आहे. सदर जागा वन उद्यानासाठी वापरात आल्यास नागरिकांना फायदा होईल. सद्यपरिस्थितीला, निरगुडी व वडगाव शिंदे सोबतच लोहगाव, धानोरी या भागातील नागरिकांसाठी चांगल्या दर्जाचे सुविधांयुक्त उद्यान उपलब्ध नाही. “वाढती लोकसंख्येचा विचार करता, उद्यानांची गरज भासणार आहे. या जागेत वन उद्यान विकसित झाल्यास अनेक दृष्टीने याचा फायदा नागरिकांना तसेच पर्यावरणाला व वन विभागाला होईल. म्हणूनच, सदर वनविभागाच्या जागेत उद्यान व्हावे, जेणेकरून नागरिकांना उद्यानासारखी मूलभूत सुविधा मिळेल. सोबतच, या एकूणच भागाच्या निसर्ग वैभवात निश्चितच भर पडेल, असे मत बापूसाहेब पठारे यांनी मांडले.

सदर वन उद्यान उभारल्यास काय फायदे होतील?

पर्यावरणीय फायदे :

  • जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मदत होईल.
  • वृक्षराजीमुळे मातीची धूप थांबेल.
  • प्रदूषण कमी होऊन ऑक्सीजन प्रमाण वाढेल.

नागरिकांसाठी फायदे:

  • आरोग्यदायी जीवनशैलीला चालना मिळेल.
  • निसर्गाच्या सहवासात मानसिक स्वास्थ्य सुधारेल.

वन विभागासाठी फायदे:

  • वनसंवर्धन व हरित विकासाचे उत्तम उदाहरण निर्माण होईल.
  • शैक्षणिक केंद्र म्हणून उपयोगास येईल.