Pune Pimpri Chinchwad News | पुणे : राज्यातील पहिला तृतीयपंथीयांचा सामुदायिक विवाह सोहळा पिंपरी चिंचवड शहरात

पुणे / पिंपरी : Pune Pimpri Chinchwad News | राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा आज मंगळवार (दि.२८) रोजी पिंपरी चिंचवड शहरात पार पडत आहे. या विवाह सोहळ्यामुळे पुरोगामी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी एका स्तुत्य सामाजिक उपक्रमाची भर पडत आहे. हा सोहळा ‘नारी द वुमन’ संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव तसेच पत्रकार अरुण (नाना) कांबळे यांच्या प्रयत्नातून पार पडत आहे. (community marriage ceremony of LGBTQ+ couples In pimpri chinchwad pune)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासावर त्यांनी महत्त्वपूर्ण भर दिला. परंतु त्याही पलीकडे जाऊन हे शहर सामाजिक दृष्ट्या सुसंस्कृत व्हावे तसेच समाजातील अंतिम घटकाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न केले आहेत. तृतीयपथीयांचा सामुदायिक विवाह हा याच प्रयत्नांचा एक दृश्य परिणाम म्हंटला जात आहे.

आज मंगळवार (दि.२८) रोजी ‘नारी द वुमन’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथीय पाच जोडप्यांचा सामुदायिक विवाह, सायंकाळी ७:०० वाजता बालाजी लॉन्स काळेवाडी येथे संपन्न होत आहे. या उपक्रमास अनेकांचे मौलिक सहकार्य लाभले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरोबरच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे, अल्केश त्रिपाठी, माजी नगर सदस्य सुप्रिया चांदगुडे, मल्लीशेठ कदरापूरकर अशा लोकांचा हातभार या उपक्रमासाठी लागला आहे.

मंगळवारी सकाळी ११:०० वाजता साखरपुडा समारंभ तर दुपारी २:०० वाजता हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी ७:०० वाजता पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत या वधू-वरांचा विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्याचे एडीजीपी कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.