Pandharpur News | विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना आता व्हीआयपी दर्शन; मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर : Pandharpur News | विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी देवदर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. याबरोबरच विवाहाच्या बंधनात अडकल्यानंतर नवविवाहित जोडपे आपली सुखी संसाराची सुरुवात करण्यापूर्वी देवदर्शन घेत असतात. यात प्रामुख्याने विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने जात असतात. आता पर्यंत या जोडप्याना देखील भाविकांच्या नियमित दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत होते.
दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या बरोबरच नवविवाहित जोडप्यांना देखील व्हीआयपी दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे लागलीच व चांगले दर्शन घेता येणार आहे.
याबरोबरच पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना देखील सकाळी ६ ते ७ आणि रात्री १० ते १०:३० वाजेपर्यंत दर्शनाला सोडले जाणार आहे. अर्थात यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी कमी होऊ शकेल. याची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजे २९ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून देण्यात आली आहे.