Palghar Crime News | क्रिकेटच्या मैदानावर आयुष्याचा डाव मोडला, हार्ट अटॅकने 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पालघर : Palghar Crime News | क्रिकेट खेळत असताना सलग तिसरा षटकार मारताना एका २७ वर्षीय तरुणाला हार्ट अटॅक आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सागर वझे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर अवघ्या २७ व्या वर्षी आयुष्याचा डाव मोडल्यामुळे पालघरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा चांगला क्रिकेट खेळत असल्याने त्याने लागोपाठ दोन चेंडूवर दोन षटकार मारले मात्र तिसरा षटकार मारत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले. तरुण वयातच सागरचा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने आता त्याचा खेळ पाहता येणार नसल्याची खंत या परिसरातील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंनी व्यक्त केली. सागरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला.

सागरला या अगोदरही हार्ट अटॅक आला होता. तेव्हा डॉक्टरने त्याला क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र क्रिकेटची आवड असल्याने तो शुक्रवारी आपल्या गावातील क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता.