Accident On Pune Bangalore Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूर नजीक कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, भीषण अपघातात सहकार निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

बेळगाव : Accident On Pune Bangalore Highway | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूर नजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात चिकोडी यातही सहकार निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अमित नायकू शिंदे (वय- ४४, रा- अकोळ, ता- निपाणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अपघातात जखमी झालेल्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी अमित शिंदे हे आपले मित्र महालिंग खुबी, सद्दाम जमादार, नरसू बन्ने यांच्यासमवेत मूडबिद्री येथे गेले होते. तेथून ते बंगळूर येथून मूळ गावी परतत होते. यावेळी कार अमित शिंदे चालवत होते. त्यांची कार महामार्गावर कित्तूर नजीक आली असता पुढे निघालेल्या ट्रकला कारची मागून धडक बसली. यामध्ये अमित सह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचारासाठी नेत असताना अमित यांचा वाटेतच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळतात कित्तूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृत व जखमींची ओळख पटवीत नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली. अमित यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघाताच्या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ करीत आहेत.