ACB Files Case Against Retired SDPO | सेवानिवृत्तीनंतर उपविभागीय पोलीस अधिकार्‍याला ACB चा दणका; उत्पन्नापेक्षा 28 लाख 74 हजारांची मालमत्ता अधिक, पत्नीसह सेवानिवृत्त SDPO यांच्यावर गुन्हा दाखल

ACB Trap News

घाटंजी (यवतमाळ) : ACB Files Case Against Retired SDPO | उत्पन्नापेक्षा २८ लाख ७४ हजार रुपयांची मालमत्ता अधिक धारण केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दणका दिला आहे. ही मालमत्ता भष्टमार्गाचा अवलंब करुन धारण केल्याबद्दल पत्नीसह त्यांच्यावर नांदेडमधील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संजय पूजलवार (Sanjay Pujalwar) , सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी (गट अ) आणि मनीषा संजय पूजलवार Manisha Sanjay Pujalwar (दोघे रा. आमदारनगर, मालेगाव रोड, नांदेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक संतोष कमलाकर गुर्जर यांनी फिर्याद दिली आहे. संजय पूजलवार यांनी वणी आणि यवतमाळ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. नांदेड येथे असताना ते २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. संजय पूजलवार यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली. ही चौकशी १ मे १९९८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील मालमत्तेची करण्यात आली आहे. त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा त्यांची मालमत्ता २८ लाख ७४ हजार १४६ रुपयांनी जास्त आढळून आली. त्यांनी संपादित केलेल्या या मालमत्तेबाबत ते पुरेसे पुरावे सादर करु शकले नाहीत. त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांना प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता स्वत:चे नावे, त्यांची पत्नी मनीषा संजय पूजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. त्यांच्या एकूण कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत १६.६५ टक्के जास्त असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. ही मालमत्ता त्यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी संजय पुजलवार याला त्याची पत्नी मनीषा संजय पुजलवार हिने मदत करुन गुन्ह्यास प्रोत्साहित केल्याने त्या दोघांविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे (Sandeep Palve SP), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार (Sanjay Tungar Addl SP) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार (DySP Prashant Pawar) यांच्या पर्यवेक्षणाखाली कारवाई करण्यात आली आहे़ पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर (PI Madhuri Yavlikar) तपास करीत आहेत.