Sanjay Raut On PMC Elections 2025 | पुणे महापालिका निवडणुकीत आघाडी की स्वबळावर, संजय राऊतांनी शिवसैनिकांना सांगितले, बैठकीत पदाधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर

पुणे : Sanjay Raut On PMC Elections 2025 | सोमवारी दुपारी पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर पदाधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत राऊत यांनी आगामी पुणे महापालिका निवडणुकीबाबत महत्वाचे मार्गदर्शन उपस्थित शिवसैनिकांना केले. निवडणुकीत आघाडी होणार की स्वबळावर लढणार, यावर देखील त्यांनी भाष्य केले. दरम्यान, या बैठकीत शहरातील पदाधिकार्‍यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने त्याची चर्चा सध्या रंगली आहे.

शिवसेनेच्या या बैठकीला पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, रविंद्र मिर्लेकर, संपर्क नेते सचिन आहेर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, श्वेता चव्हाण, संजय भोसले व अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक महिनाभरापूर्वी भाजपामध्ये गेले. याचा संदर्भ घेत संजय राऊत म्हणाले की, जे गेले ते गेले, त्यांचा विचार करू नका, त्यांच्याकडे ज्या जबाबदार्‍या होत्या, त्यावर लगेचच नवीन लोकांना संधी द्या, एकूणच जे जुने पदाधिकारी आहेत, काम करत नाहीत, त्यांना मोकळे करा व तिथे नवीन तरूण रक्ताला संधी द्या.

राऊत पुढे म्हणाले की, महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडीबरोबर याचा निर्णय नेते घेतील, मात्र तोपर्यंत आपली तयारी हवी. त्यामुळे लगेचच संघटनात्मक बांधणीला लागा, प्रत्येक प्रभागात आपले शिवसैनिक हवेत, त्यांच्या बैठका सुरू करा, असे आवाहन राऊत यांनी केले.

राऊतांसमोर शहर शिवसेनेतील दुफळी उघड
या बैठकीसाठी आलेले शिवसेना पदाधिकारी पृथ्वीराज सुतार खाली बसले होते. राऊत यांनी त्यांना वर बोलावले. ते चंद्रकांत मोकाटे यांच्या शेजारील खुर्चीवर जाऊन बसले.

यामुळे चंद्रकांत मोकाटे संतापले. कारण विधानसभा निवडणुकीत सुतार यांनी प्रचाराचे काम केले नाही असा मोकाटे यांचा आरोप आहे. सुतार हे शेजारी बसताच संतप्त झालेले मोकाटे यांनी हा काय प्रकार आहे अशी विचारणा त्यांनी केली.

यानंतर सभागृहात उपनेत्या अंधारे आल्या असता मोकाटे यांनी उठून आपली खुर्ची त्यांना दिली. मात्र ते उठून शहरप्रमुखांच्या शेजारी उभे राहिले. नंतर तेथून ते थेट सभागृहाच्या बाहेर निघून गेले. हा सर्व प्रकार संजय राऊत यांच्यासमोरच सुरू होता.