Nashik Crime News | क्रिकेटच्या मैदानावरील तो सामना आयुष्यातील शेवटचा ठरला, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तरुणाचा जागीच मृत्यू

नाशिक : Nashik Crime News | क्रिकेटच्या मैदानावर सामना खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने तरुणाचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या दहिवडी गावात घडली आहे. यामुळे त्याच्यासाठी हा सामना अंतिम ठरला आहे. यश सुनील अहिरे (वय-२४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड गावातील क्रिकेटपटू आणि आरंभ ऑनलाइन सर्विसेस’चे संचालक यश सुनील अहिरे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात आणि तालुक्यात शोककळा पसरली आहे. देवळा तालुक्यात एका महत्त्वपूर्ण क्रिकेट सामना सुरु असताना यश अहिरे हा आपल्या संघासाठी खेळत होता. फलंदाजी करत त्याने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मात्र, दुर्दैवाने तो सामना त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
सामन्यादरम्यान यशने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत आपली चमक दाखवली. यशची फलंदाजी सुरु असताना उपस्थित प्रेक्षकांनी देखील त्याच्या खेळाला जोरदार प्रतिसाद दिला. मात्र तो बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर बसल्यानंतर त्याला प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने तो संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध झाला होता. गावकऱ्यांना विविध ऑनलाईन सेवा पुरवून त्यांनी अनेकांची कामे सुलभ केली होती. दहिवडसह संपूर्ण तालुका आज यशच्या या दुर्दैवी घटनेमुळे शोकमग्न झाला आहे. मैदानावर शेवटच्या फटक्यांसह संघाला विजयाकडे नेणारा हा खेळाडू मैदानाबाहेर शेवटची झुंज हरला.
दरम्यान यशच्या शेवटच्या सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो शेवटचे फटके मारताना आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होता. मात्र, हा आनंद काही काळच टिकला. व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण भावूक होत आहेत.