Nanded City Pune Crime News | ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी जेरबंद

arrest

लुबाडणुक करण्याचा नवा प्रकार आला समोर, काय आहे हा प्रकार वाचा सविस्तर

पुणे : Nanded City Pune Crime News | डीएसके रोड ते रायकर मळा येथे काही तरुण गाड्या अडवितात. माझ्या घरी मेडिकल इमर्जन्सी आहे, असे सांगून गाडीत बसतात. गाडी घरी घेण्यास सांगून निर्जन ठिकाणी नेऊ मारहाण करुन पैसे, मौल्यवान ऐवज लुटतात, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत होता. पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, अक्षय जाधव यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नांदेड सिटी पोलिसांनी सापळा रचून तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांना पकडले. त्यातून लुबाडणुक करण्याचा नवाच प्रकार समोर आला आहे. (Arrest In Robbery Case)

हे तरुण ‘गे’लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपद्वारे मैत्री करतात. त्यांना भेटायला बोलावतात. त्यानंतर निर्जन ठिकाणी घेऊन जातात. कोवळा तरुण दिसल्याने हे गे लोकही तो सांगेल, त्यानुसार तिकडे जातात. अचानक त्याचे तीन मित्र येतात. ते हत्याराचा धाक दाखवून त्या ‘गे’ व्यक्तीकडील पैसे, मोबाईल, सोने, महत्वाचा ऐवज काढून घेत. इतकेच नाही तर त्यांच्या बँक खात्यातील पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करुन घेतात. बदनामी होईल या भितीने हे लोक तक्रारही करत नाही. त्यामुळे त्यांचा हा धंदा जोरात सुरु होता.

नांदेडसिटी पोलिसांनी भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) याला अटक केली असून त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत एका ३२ वर्षाच्या हॉटेल व्यावसायिकांने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्याबाबत हा प्रकार १४ जानेवारी रोजी सायंकाळी डी एस के विश्व शाळेमागे घडला होता. त्यांनी गुगल प्ले स्टोअर्समधून ग्रॅन्डर हे अ‍ॅप डाऊनलोड करुन घेतले होते. १३ जानेवारी रोजी एका मुलाचा या अ‍ॅपवर मेसेज आला. त्यानंतर ते दोघे एकमेकांबरोबर बोलू लागले. त्या मुलाने फिर्यादीला डी एस के विश्व येथील कमानीजवळ बोलविले. ते तेथे गेले असताना त्या मुलाने त्यांची मोटारसायकल तेथेच लावायला लावून मुलाच्या दुचाकीवरुन ते शाळेमागे गेले. त्यांनी गाडी पार्क केल्यानंतर तिघे जण अचानक आले. ते आल्यावर या मुलाने फिर्यादींना शिवीगाळ करुन खिशातील पैसे, मोबाईल व कानातील दोन सोन्याच्या बाळ्या काढून देण्यास सांगितले. त्यांनी विरोध केल्यावर त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे, कानातील बाळ्या, जबरदस्तीने काढून घेतल्या. मोबाईलवरील फोन पेचा पासवर्ड विचारला. बँक खात्यातून ५ हजार रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करुन घेतले. त्यांच्याकडील २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटला व ते पळून गेले. या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेले होते. बदनामी होईल म्हणून त्यांनी भितीपोटी कोणाला हा प्रकार सांगितला नव्हता. पोलिसांनी त्यांना हिम्मत दिल्याने त्यांनी फिर्याद दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त बापूरसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुणगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेंगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे, मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.