Pune Metro News | पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये 1 तासाची वाढ करून ही सेवा रात्री 11 पर्यंत वाढवण्याचा निर्णय

पुणे : Pune Metro News | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम मर्गिकांचे लोकार्पण पार पडले होते. यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाझ या दोन्ही मार्गिका पूर्णपणे सुरू झाल्या. दरम्यान आता यावर लोकांचा वाढता वापर आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या दोन्ही मर्गिकांवरील पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ ते रात्री १० अशी आहे. तर आता उद्या (दि.२६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत या सेवेमध्ये १ तासाची वाढ करून ही प्रवासी सेवा रात्री ११ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोची वारंवारता गर्दीच्या वेळी (स.८ ते ११ आणि संध्या. ४ ते ८) दर ७ मिनिटांनी व कमी गर्दीच्या वेळी (स. ६ ते स. ८, स. ११ ते दु. ४ आणि रा. ८ ते रा.१०) दर १० मिनिटांनी आहे. आता रात्री १० ते ११ या वाढलेल्या वेळेमध्ये मेट्रोची वारंवारता दर १५ मिनिटांनी असणार आहे.

पुणे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये मेट्रो कार्डचा वाढता वापर लक्षात घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रो उद्या २६ जानेवारी रोजी एक पुणे ट्रान्झिट कार्ड फक्त २० रुपयांना उपलब्ध करून देत आहे. या दिवशी पहिल्या ५ हजार प्रवाशांना पुणे ट्रान्झिट कार्ड २० रुपयांना मिळणार आहे. या कार्ड साठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यक नाही. प्रवासी आपल्या जवळच्या मेट्रो स्थानकातून हे कार्ड खरेदी करू शकतात.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले , ” सध्या पुणे मेट्रोचा वाढता वापर लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ केली आहे. रात्री कामावरून उशिरा घरी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे प्रवाशांना वेळेची बचत आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. एक पुणे ट्रान्झिट कार्ड हे प्रजासत्ताक दिनी फक्त २० रुपयात उपलब्ध आहे, यातून डिजिटल तिकीट पर्यायाला चालना देण्याचा प्रयत्न मेट्रो करीत आहे.”