Lonikalbhor Pune Crime News | एमपीडीए मधील फरार गुन्हेगाराला आळंदीतील डोंगरावरील मंदिरातून केले अटक

पुणे : Lonikalbhor Pune Crime News | खंडणी, जबरी चोरी, दुखापत असे गंभीर गुन्हे असल्याने त्याला तडीपार केले होते. तरीही तो पुण्यात येऊन गुन्हे करत असे. त्यामुळे त्याच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात आली. ते समजल्यावर तो फरार झाला होता. लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्हेगाराला म्हातोबाची आळंदी जवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरातून ताब्यात घेतले. (Criminal Arrested Who Abscond In MPDA Act)
शुभम संजय धुमाळ Shubham Sanjay Dhumal (वय २३, रा. धुमाळमळा, कुंजीरवाडी) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला अटक करुन एक वर्षासाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
शुभम धुमाळ याच्याविरुद्ध लोणी काळभोर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यात खंडणी, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वाढते गुन्हेगारी स्वरुप लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस उपायुक्त आर राजा यांनी त्याला जुलै २०२४ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही तडीपारीचा भंग करुन वारंवार लोणी काळभोर परिसरात येत होता. त्यामुळे त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची गरज असल्याने पोलिसांनी एम पी डी एचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्याविषयी माहिती मिळताच शुभम हा फरार होऊन लपवून बसला होता. त्याने मोबाईल व सर्व प्रकारची संपर्क साधने बंद केली होती. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. फरार कालावधीत त्याच्या हातून गंभीर गुन्हा घडल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले. अहोरात्र मागोवा घेतल्यानंतर तो म्हातोबाची आळंदीजवळील डोंगरामध्ये असलेल्या गवळेश्वर मंदिरात लपवून बसल्याची माहिती मिळाली. त्याची खात्री करुन २४ जानेवारीच्या पहाटे पोलिसांनी तो बेसावध असताना मंदिरातून त्याला अटक केली. त्यानंतर नाशिक कारागृहात रवानगी केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, हवालदार सातपुते, शिंदे, देवीकर, नागलोत, वाघमोडे, भोसले, पोलीस अंमलदार नरसाळे, ढमढेरे, भोसुरे, वीर, कुदळे, पाटील, शिरगिरे, गाडे, कर्डीले यांनी केली आहे.