Pune Police News | अवैध धंदे आणि गैरप्रकार सहन करणार नाहीत; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या इशार्याने पोलीस दलातील वातावरण ‘टाईट’

पोलीस अधिकार्यांकडून पारदर्शक आणि प्रामाणिक पोलिसिंगची अपेक्षा
पुणे : Pune Police News | पोलीस अधिकार्यांकडून पारदर्शक आणि प्रामाणिक पोलिसिंगची अपेक्षा आहे. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असतील तर ते सहन करणार नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार सातत्याने गुन्हे करत असतील तर त्या अधिकार्यांची बदली करावीच लागेल. जे अधिकारी दिलेले उद्दिष्टे पूर्ण करतील, तेच अधिकारी तेथे राहतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी सांगत सर्व पोलीस अधिकार्यांना इशारा दिला आहे. पोलीस आयुक्तालयातील वार्षिक परिषदेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिला आहे.
पोलीस अधिकार्यांच्या सातत्याने बदल्या केल्या जातात. अधिकारी बदलून गेला की, नव्या आलेल्या अधिकार्याला हद्द व पोलीस ठाण्याचे कामकाज समजून घेण्यास वेळ लागतो. त्यामुळे त्याचा लोकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहे. इतक्या सातत्याने बदल्या का केल्या जातात, या प्रश्नावर पोलीस आयुक्त बोलत होते.
अमितेश कुमार म्हणाले की, गेल्या वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत्या. निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार एखादा पोलीस अधिकारी २ वर्ष त्या जिल्ह्यात असेल तसेच त्याचा होम जिल्हा असेल तर त्याची बदली करावी लागली. या निवडणुका पार पडल्यानंतर आता काही अधिकारी पुन्हा मुळ जिल्ह्यात परत आले आहेत. त्यामुळे अनेक बदल्या केल्या गेल्या आहेत.
जे अधिकारी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करतील, असेच अधिकारी तेथे राहतील. ज्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असतील. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून सातत्याने गुन्हे होत असतील, गैरप्रकार होत असतील, अशा अधिकार्यांना बदलावेच लागेल. आपल्याला अधिकार्यांकडून पारदर्शक आणि प्रामाणिक पोलिसिंग अपेक्षित आहे. पोलीस अधिकार्यांकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत, हे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या अंतर्गत बैठकींमध्ये यापूर्वी सांगितले असेल. ती बाब पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा जाहीरपणे सांगितल्या.