Pune Police News | डायल 112 वरील रिस्पॉन्स टाईम 7 वरुन 5 मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न; पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा 2025 मधील संकल्प

पुणे : Pune Police News | शहरात वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. असे असले तरी त्यावर आपण समाधानी नाही. एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यास सध्या पोलिसांना सरासरी ७ मिनिटे लागतात. हा रिस्पॉन्स टाईम कमी करुन तो ५ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जुन्या बीट मार्शल पद्धतीत बदल करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी सांगितले.
पुणे शहरातील गुन्ह्यांचा वार्षिक आढावा परिषदेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी २०२५ चे व्हिजन जाहीर केले. खून, खूनाचा प्रयत्न यामध्ये २०२३ च्या तुलनेत ९ व २४ टक्क्यांनी घट झाली आहे. घरफोडींच्या घटनेत १३ टक्क्यांनी घट झाली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे प्राधान्याने नोंदवून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. अत्याचाराच्या प्रकरणात १२०० फिर्यादी पीडित महिलांना आधार देण्यासाठी पोलिसांचे भरोसा सेल त्यांच्या संपर्कात आहे.
सोनसाखळी चोरट्यांवर जरब बसविण्यासाठी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. अवैध धंदे चालविणार्या आणि जमिनीचा बेकायदेशीर ताबा मारणार्या खंडणीखोरांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, चार भिंतींच्या घरात होणारे गुन्हे पोलीस रोखू शकत नाही. मात्र, रस्त्यावर होणारे गुन्हे रोखण्याचे पोलिसांचे काम आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न असतील. नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन मदत मागितली की त्याला लवकरात लवकर मदत पोहचाविण्यासाठी सध्या सुरु असलेल्या बीट मार्शल पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. नवी पद्धत ही गुन्हे शाखेच्या नियंत्रणात असेल. कॉप २४ चे प्रशिक्षण सध्या सुरु आहे. त्याचबरोबर ३९ मोबाईल व्हॅन शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतील. सध्या १२५ दुचाकी पेट्रोलिंगसाठी आहेत. त्यातील ६० दुचाकी या ११२ वरुन येणार्या प्रतिसादासाठी असतील. ६० ते ६५ दुचाकी या इतर कामासाठी असणार आहेत. त्यातून पोलिसांना घटनास्थळी तातडीने पोहचणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पोलिसांचा रस्त्यावरील प्रेझेंन्स अधिक दिसून येईल.
महिलांची सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बेकादेशीर शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर शहरात पुरवठा होतो. हा पुरवठा रोखण्यासाठी बेकायदा शस्त्र बाळगणार्यांवर कारवाईत सुधारणा करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
- वर्षभरात १०३ गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करुन राज्याच्या वेगवेगळ्या कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध
- शहरात दहशत पसरवणार्या संघटित गुन्हेगारी करणाºया टोळ्यांवर जरब बसविण्यासाठी ३४० गुंडावर मोक्का कारवाई करण्यात आली.
- ११२ वरील प्रतिसाद वेळ ७ मिनिटांवरुन ५ मिनिटांवर आणण्याचा प्रयत्न
- पेट्रोलिंग करणारी जुनी बीट मार्शल सिस्टिम बदलणार, तिचा कंट्रोल गुन्हे शाखेकडे येणार
- अल्पवयीन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी ‘मिशन परिवर्तन’
- शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी ‘मिशन निर्धार’ अभियान राबविण्यात येत आहे.
अत्याधुनिक सायबर लॅब
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. सायबर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक सायबर लॅब पुण्यातही असावी, यासाठी गृह विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर विशिष्ट रक्कमेच्या सायबर गुन्ह्यांचा प्राधान्याने तपास करण्याचा निर्णय येणार आहे.