Arms Licence In Pune | पुण्यात सन 2021 ते 2023 दरम्यान आर्म लायसन्सची ‘खैरात’ ! 659 आर्म लायसन्स चे परवाने दिले; मात्र 2024 मध्ये फक्त 23

पुणे : Arms Licence In Pune | बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा सध्या संपूर्ण राज्यात आहे. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शेकडो जणांना आर्म लायसन्स दिल्याचे स्पष्ट झाले. आर्म लायसन्सच्या जीवावर अनेक जण टोळ्या जमवून गुन्हेगारी करत असल्याचे पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar IPS) यांनी अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या किंवा शस्त्र परवान्यांचे वेळेत नुतनीकरण न करणार्या १११ जणांचा शस्त्र परवाना रद्द केला. नवीन केवळ वारसा हक्काने व खेळाडु असलेल्या २३ जणांना वर्षभरात शस्त्र परवाना दिला गेला. ते पहाता त्याच्या मागील ३ वर्षात शस्त्र परवान्याची खैरात वाटल्याचे दिसून आले आहे. २०२१ ते २०२३ या तीन वर्षात तब्बल ६५९ शस्त्र परवाने दिल्याचे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे याच काळात एकही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला नव्हता. (Pune Police News)
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२४ मध्ये घडलेले गुन्हे आणि पोलिसांनी केलेली कारवाई याबाबतची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन शस्त्र परवान्याने देण्यावर कडक निर्बंध आणले. इतकेच नाही तर अगोदर दिलेल्या शस्त्र परवान्यांची तपासणी कडक केली. १११ परवाने रद्द करण्याबरोबरच २०० जणांना नोटीस पाठविली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्याअगोदर ४२ शस्त्र परवाने देण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरात केवळ २३ शस्त्र परवाने दिले गेले, तेही वारसा हक्काने व खेळाडुंसाठी देण्यात आले आहेत.
पुणे शहरामध्ये आतापर्यंत साडेपाच ते सहा हजार जणांना शस्त्र परवाना दिला आहे. पुणे व परिसरात अनेक लष्करी आस्थापना आहेत. तसेच अनेक निवृत्त लष्करी व प्रशासनातील अधिकारी राहतात. शस्त्र परवान्यांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. त्या खालोखाल व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. अनेक जण स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना घेत असले तरी त्यातील बहुतेक जण राजकीय आणि स्टेटस सिंबॉल म्हणून शस्त्र परवाना घेताना अनेकदा दिसून येते. अशांना गेल्या वर्षभरात रिकाम्या हाती परतावे लागले आहे. कोणताही वशिला लावूनही शस्त्र परवाना मिळू शकत नाही, असे गेल्या वर्षीतील आकडेवारीवरुन दिसून येते.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ८६१ लोकांना शस्त्र परवाने दिले गेले आहेत. त्यात प्रामुख्याने राजकीय प्रतिष्ठित, व्यावसायिक, सधन शेतकरी, एमआयडीसीतील उद्योजक यांचा समावेश आहे. जिल्ह्यात जमिनीवरुन वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवाने घेणार्याचे प्रमाण वाढले आहे.
वर्ष दिलेले शस्त्र परवाने रद्द केलेले शस्त्र परवाने
२०२४ २३ १११
२०२३ १८६(४२) ०
२०२२ २७९ ०
२०२१ १५२ ०
(४२) हे जानेवारी २०२४ मधील