Ladki Bahin Yojana | मंत्री आदिती तटकरेंचे मोठे भाष्य; म्हणाल्या – “लाभार्थी लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार नाही, मात्र ज्यांनी…”

मुंबई : Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात ऐतिहासिक ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी ही योजना गेमचेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं. या योजनेत ज्या महिला निकषात बसल्या नाहीत त्यांचे पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. दरम्यान आता याबाबत महत्त्वाची आणि मोठी अपडेट महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ” या योजनेत ज्या लाभार्थी महिला आहेत आणि ज्या योजनेच्या निकषात बसत नाही आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे किंवा ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे. ज्या महिला नियमात बसत नाहीत, अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र यानंतर काही महिलांनी या योजनेतील पैसे सरकारला परत केले होते. पण सरकारने दिलेले पैसे कुठल्याही लाडक्या बहिणींकडून परत घेणार नाही किंवा आम्ही पैसे परत घेतले नाहीत.

तसेच याबाबत कुठलाही शासकीय स्तरावर निर्णय झालेला नाही. अशी कुठलीही महायुतीमध्ये चर्चा झालेली नाही. परंतु जर लाडक्या बहिणी स्वखुशीने सरकारला पैसे परत करीत आहेत. तसेच आम्ही योजनेच्या निकषात बसत नाही, असे म्हणून लाभार्थी बहिणींनी पैसे परत करीत असतील किंवा केले असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र सरकारने स्वतःहून कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत, असे तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.