Dhankawadi Pune News | धनकवडीतील कदम प्लाझा ते ग्रीन पार्क बिल्डिंग समोरच्या सर्व्हिस रोडवर ‘नो पार्किंग’ झोन; हजारो दुचाकी आणि कार चालकांना मोठा दिलासा

पुणे : Dhankawadi Pune News | व्यावसायीकांच्या फायद्यासाठी वर्षानुवर्षे धनकवडी येथील भारती विद्यापीठ समोरील कदम प्लाझा येथील अरुंद सर्व्हिस रस्त्यावरील पार्कींगकडे दुर्लक्ष करणार्या वाहतूक पोलिसांना आता उपरती झाली आहे. या सर्व्हिस रस्त्यावर पार्किंगमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यावरील पार्किंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सातारा रस्त्यावरून या रस्त्याने लेकटाउन मार्गे बिबवेवाडी कडे जा ये करणार्या हजारो दुचाकी चालक आणि कार चालकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
भारती विद्यापीठासमोरील भुयारी मार्गातून तसेच सातारा रस्त्याने भुयारी मार्गाच्या कडेने लेकटाउनकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्याचा वापर प्रामुख्याने दुचाकी वाहन चालक आणि छोट्या वाहनांसाठी करण्यात येतो. या रस्त्यामुळे सुखसागरनगर, अप्पर इंदिरानगर आणि बिबवेवाडीतील दीड लाख नागरिकांना पर्यायी रस्ता आहे. मात्र, या रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन इमारतींमध्ये व्यावसायीक आस्थापना आणि दुचाकींची मोठ्याप्रमाणावर वर्दळ असलेले पिझ्झा हट आहे. त्यामुळे जवळपास १७६ मीटर लांबीच्या आणि जेमतेम चार ते पाच मीटर रस्त्याच्या कडेला सर्रास दुचाकी उभ्या केल्या जातात. येथील दुकानांमध्ये चार चाकी वाहनांतून येणारे चालकही तेेेथेच वाहन उभे करतात. त्यामुळे दुतर्फा वाहतूक असलेल्या या रस्त्यावर कोंडी होते.
येथील भुयारी मार्गातून भारती हॉस्पीटलकडे जाणार्या रुग्णवाहीकांची देखिल गर्दी असते. रुग्णवाहीका कोंडीत अडकत असल्याने रुग्णांना देखिल अडचणींचा सामना करावा लागतो. भारती हॉस्पीटल प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी भुयारी मार्गाजवळ सुरक्षा रक्षक उभे केले आहेत. परंतू सर्व्हिस रोडवर वाहतूक कोंडी झाल्यास भुयारी मार्गातही वाहनांच्या रांगा लागत असल्याने त्यांचाही फारसा उपयोग होत नाही. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कदम प्लाझापासून ग्रीन पार्क बिल्डिंगपर्यंत नो पार्कींग झोन जाहीर केला आहे. यासंदर्भात कोणाच्या हरकती असतील तर ५ फेब्रुवारी पर्यंत वाहतूक पोलिसांना लेखी स्वरुपात कळवाव्यात असे आवाहन केले आहे.