Amravati Crime News | तूर काढणीच्या मशीनमध्ये पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू , परिसरात खळबळ

अमरावती : Amravati Crime News | तूर काढणी करीत असताना तूर काढणीच्या मशीनमध्ये पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आडगाव खाडे गावच्या शेत शिवारात घडली आहे. अंकुश रंगराव सरदार (वय-३२) असे मृत झालेल्या मजुराचे नाव आहे.

तूर काढणीसाठी हेडंबा मळणी यंत्राच्या कटर याचा वापर शेतकरी आता करत असतात. ज्यामुळे तूर काढणीचे काम लवकर आणि कमी माणसांच्या वापर करून होत असते. त्यानुसार तूर काढणीच्या कामासाठी हेडंबा मळणी यंत्र या कटर मशीनद्वारे तूर काढणी सुरु होती. यासाठी अडगाव नबापूर शेत शिवारात अंकुश सरदार हे उमेश हेंड यांच्या शेतात तुर काढणीच्या कामासाठी गेले होते.

अंकुश सरदार मळणी यंत्रावर तूर काढण्यासाठी तुरीच्या झाडाच्या काड्या यंत्रात टाकण्याचे काम करण्यासाठी मशीन वर चढलेले होते. हे काम करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते मळणी यंत्राच्या कटरमध्ये पडले. क्षणार्धात अंकुश हे मशीनच्या आतमध्ये ओढले गेल्याने पाय आणि कमरेचे तुकडे झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतातील अन्य मजूर व शेतमालक प्रचंड घाबरले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी अंजनगाव सूर्जी येथील पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.