Walmik Karad | वाल्मिक कराड प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून दोन तास चौकशी

पुणे : Walmik Karad | सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात प्रकरणात सीआयडीने (Pune CID) खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रूपयाच्या जमिनी आणि शॉप खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यातच फर्ग्युसन कॉलेज (FC College Pune) समोरील एका इमारतीमध्ये ३ ऑफिस वाल्मिक कराड यांनी पत्नीच्या नावाने खरेदी केल्याचे समोर आले.
हे शॉप खरेदी करण्यास पुण्यातीलच भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे (Datta Khade) यांनी मदत केल्याने सीआयडीकडून दत्ता खाडे यांना नोटीस बजविण्यात आली असावी, अशी चर्चा पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात होती. त्या सर्व घडामोडी दरम्यान काल सोमवार (दि.२०) केज येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीला दत्ता खाडे सामोरे गेले.
एकूणच या चौकशी वरून माध्यमांशी बोलताना दत्ता खाडे म्हणाले, ” काल केज येथे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करिता बोलवले. त्यानंतर मी चौकशीला गेल्यावर मला अधिकार्यांनी जवळपास २० प्रश्न विचारले. तुमचा आणि वाल्मिक कराड यांच्या संबध बाबत, तुमच्या मुलाच्या लग्नाला आले होते. यासह अनेक प्रश्न विचारण्यात आले. मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिले आणि तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सोडले आहे. तसेच पुन्हा चौकशीला बोलवल्यास जाणार आहे.
या भागातील नगरसेवक राहिल्याने अनेकजण शॉप किंवा घर खरेदी करताना माझा सल्ला घेतात, जेणेकरून खरेदी मध्ये काही सवलत मिळेल, पण फर्ग्युसन कॉलेज समोरील ऑफिस खरेदीमध्ये मला कोणाचाही फोन आला नाही. तसेच या प्रकरणी संबधित बिल्डर अधिक माहिती देऊ शकेल, कोणाचा फोन आला, किती कोटींचा व्यवहार झाला. त्यामुळे माझा या खरेदी प्रकरणाशी काही संबध नसून माझी आणि वाल्मिक कराड यांची जात एकच आहे. यामुळे मला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ते पुढे म्हणाले, ” मी सार्वजनिक जीवनात जवळपास ४० वर्षांपासून असून तीन वेळा नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेमध्ये काम केले आहे. या राजकीय जीवनामध्ये माझा संबध गोपीनाथ मुंडे यांच्याशी आला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार राजकीय जीवनात काम करीत राहिलो. गोपीनाथ मुंडे ह्यात असताना, माझी वाल्मिक कराड यांच्याशी तीन ते चार वेळा भेट झाली असेल, त्यानंतर कधी ही आमची भेट झाली नाही किंवा फोन देखील झाला नाही”, असे खाडे यांनी म्हंटले आहे.